नवी दिल्ली : मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आज दिल्लीत दाखल होत आहेत. या दिल्लीवारीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आधी पंतप्रधान नरेद्र मोदी मग काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यानंतर भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची भेट घेणार आहेत. खरं तर हा अचानक दौरा का आणि कशासाठी?, असा प्रश्न राजकीय वर्तुळात सुरू होता. पण महाराष्ट्र राज्याच्या विकासासंदर्भात एक महत्वाची बैठक नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये होणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीत महाराष्ट्रासाठी लागणार निधी, शेतकऱ्यांचे प्रश्न, पिकविमासंदर्भातले प्रश्न, अयोध्या आणि रिफायनरी इतर विषयांवर चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. आज सायंकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेट होईल. त्यानंतर 6 वाजता सोनिया गांधी आणि मग त्यानंतर लालकृष्ण आडवाणींनीची भेट मुख्यमंत्री घेणार आहेत.
मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच दिल्ली दौरा
पंतप्रधान नरेद्र मोदींची भेट घेणार आहेत. गेल्या 25 वर्षापासून भाजपसोबत शिवसेनेची युती होती. पण 2019 मध्ये मुख्यमंत्रीपदावरून युती तुटली होती. त्याधी लोकसभेला किंवा विधानसभेच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंचा 'मेरे छोटे भाई' असा वारंवार उल्लेख करायचे. पण विधानसभेनंतर हळूहळू या नात्यामध्ये कटुता निर्माण झाली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या साथीनं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करून भाजपला बाहेरचा रस्ता दाखवला. या सगळ्या नाट्यरूपी सत्ता स्थापनेनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच पंतप्रधान नरेद्र मोदींना भेटण्यासाठी दिल्लीत दाखल होणार आहेत. या दोघांमध्ये आता नेमकी काय चर्चा होणार हे पहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पाहा व्हिडीओ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार
दिल्लीवारीत 'ठाकरे' साधणार समतोल
पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना भेटून समतोल साधणार आहेत. कारण राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शपथविधीचं आमंत्रण देण्यासाठी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. आता स्वत: उद्धव ठाकरे सोनिया गांधींना भेटायला येत आहेत. दिल्लीत येऊन मोदींना भेटले आणि सोनिया गांधीची भेट न घेता निघाले असते, तर चुकीचा संदेश गेला असता त्यामुळे या भेटीत समतोल साधण्याचा प्रयत्न ठाकरेंनी केला आहे. तसेच लालकृष्ण अडवाणींना भेटून आपण आजही भाजपच्या जेष्ठ नेत्यांना विसरलो नाही हा संदेश देखील भाजपच्या नेत्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहेत.
संबंधित बातम्या :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्लीत सोनिया गांधींना भेटणार!
लहान भाऊ मोठ्या भावाला भेटणार! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची उद्या पंतप्रधान मोदींशी भेट