Raghunath Patil : उशिरा का होईना पण आई भवानीच्या कृपेनं महाराष्ट्रात पाऊस आला आहे. अशातच तुमचे मंत्री परराज्यात गेले आहेत. त्यास आठवडा उलटला तरी परत येण्याची चिन्ह दिसत नाहीत. त्यामुळं आता त्या सर्व मंत्र्यांची खाती तुमच्याकडे घेऊन मंत्रालयात बसून, सर्व खात्यांचा कारभार व्यवस्थित करावा, अशी विनंती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. विशेषता कृषी खातं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेऊन राहिलेली कर्जमाफी तसेच 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान ताबडतोब द्यावं असेही पाटील म्हणाले.


1 जुलैपर्यंत मागण्या मान्य करा


दरम्यान, ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे, त्याठइकाणी पेरणीची काम सुरु आहेत. पेरणीच्या कामासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. तसेच  मुलांच्या शाळा सुरु होत आहेत. त्यासाठीही शेतकऱ्यांना पैशाची अत्यंत गरज आहे. त्यामुळं आमच्या विनंतीस मान देऊन 1 जुलै 2022 पर्यंत या गोष्टी पूर्ण कराव्यात अशी विनंती रघुनाथ पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.


काही ठिकाणी पावसानं मारली दडी


शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे  यांच्या बंडखोरीमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस यांची सत्तेत येण्यासाठी धडपड सुरु आहे. मात्र या सत्तेच्या राजकारणात शेतकरी भरडला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना त्यांच्या पळून गेलेल्या आमदारांची तर दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांना दडी मारलेल्या पावसाची प्रतीक्षा आहे. हवामान अंदाज विभागाने जून महिन्यात चांगला पाऊस येणार असल्याचं भाकीत केल्यानं शेतकऱ्यांनी सुरुवातीलाच सोयाबीन, कापूस तसेच इतर पिकांची पेरणी केली. दुसरीकडं पावसाने मात्र दडी मारल्याने अनेकांचे बियाणे जमिनीतच खराब झाले. यानंतर अनेकांनी आता दुबार पेरणी केल्यानंतर पावसाची प्रतिक्षा करीत आहे. जून महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही पाऊस मात्र दडी मारुन बसला आहे. शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे उगवलेच नसल्यानं आता सरकारनं शेतकऱ्यांना बियाणांची मदत देण्याची मागणी करीत आहे.