मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
भुमरे-अब्दुल सत्तार यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांकडून शक्तिप्रदर्शन
कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यकर्त्यांकडून आज पैठण आणि सिल्लोड मतदारसंघात रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. यावेळी मतदार संघातील कार्यकर्त्यांना या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन दोन्ही नेत्यांचे समर्थकांकडून केले जात आहे.
गुवाहाटी मधील शिंदे समर्थकांचा मुक्काम वाढला
हॉटेल रेडिसन मधील बंडखोर आमदारांच्या रुम्सचे बुकिंग 30 तारखेपर्यंत वाढवण्यात आलंय. कायदेशीर लढाई, उपाध्यक्ष यांच्यावर अविश्वास ठराव, भाजप सोबत चर्चा याला वेळ लागणार असल्यानं बंडखोर आमदार सध्या गुवाहाटीतच थांबण्याची शक्यता आहे.
शिवसेनेतल्या गटबाजीनंतर राजीनामा नाट्याला सुरुवात
ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. म्हस्के एकनाथ शिंदे गटाचे आहेत. त्यामुळे, आता आमदारांच्या नाराजीनंतर इतर पदाधिकाऱ्यांच्या नाराजीनाट्याला सुरुवात झाली आहे. गेले अडीचवर्षे आपल्या संघटनेची "राष्ट्रवादी" गळचेपी चाललेय त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. जय महाराष्ट्र! अशी फेसबुक पोस्ट नरेश म्हस्केंनी केली आहे. काल ठाण्यात श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत झालेल्या शक्तीप्रदर्शनाच्या वेळी नरेश म्हस्केही उपस्थित होते.
आदित्य ठाकरेंचा बंडखोर आमदारांना इशारा
"फ्लोर टेस्ट तर होणारच आहे. ज्या दिवशी फ्लोर टेस्ट होईल त्यादिवशी मुंबईत उतरतील. विमानतळावरुन विधानभवनात जाण्याचे रस्ते आपल्या वरळीतून आहेत. वरळी नाहीतर आपल्या परळमधून आहेत. येणार आमच्या वांद्र्यामधून. ही मुंबई आपली आहे. ती दुसऱ्या कोणाची होऊ देणार नाही. कदाचित त्या फ्लोर टेस्टसाठी केंद्र सरकार आर्मी लावू शकतील", असं आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात काल आदित्य ठाकरे बोललेत.
शिवसैनिकांसाठी एकनाथ शिंदेंचं ट्विट
एकनाथ शिंदेंनी ट्विटद्वारे शिवसैनिकांना आवाहन केलंय. प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या, म.वि.आ.चा खेळ ओळखा..! मविआ अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिताकरता समर्पित आहे अशा स्वरुपाचं ट्विट एकनाथ शिंदेंनी केलंय.
देवेंद्र फडणवीस रात्री पुन्हा मुंबई विमानतळाच्या दिशेनं
देवेंद्र फडणवीस रात्री मुंबई विमानतळाकडे गेल्याची माहिती आहे. परवा रात्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये गुजरातमध्ये भेट झाल्याची माहिती आहे. त्यानंतर फडणवीस दिल्लीतही जाऊन जे. पी. नड्डांना भेटल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे, रात्री परत फडणवीस नेमके कुठे गेले हे पाहावं लागेल.
सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना अटक
अहमदाबाद- गुजरात दंगल प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर तीस्ता सेटलवाड यांना गुजरात क्राईम ब्रांचनं ताब्यात घेतलंय. मुंबईतील जुहू येथील घरातून तीस्ता सेटलवाड यांना सांताक्रुझ पोलिस स्थानकात नेण्यात आलं. त्यानंतर, त्यांना रस्त्यानं अहमदाबादला नेण्यात आलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज 'मन की बात' कार्यक्रमातून
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज 26 जून रोजी देखील ते 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून जर्मनी आणि दुबईच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 28 जूनपर्यंत जर्मनी आणि दुबईच्या दौऱ्यावर आहेत. मोदी जी 7 शिखर संमेलनात सहभागी होणार आहेत.