Pune news : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासन आणि महापालिकेच्या विविध योजनेतील लाभार्थ्यांना थेरगाव येथे उद्या दुपारी 3 वाजता विविध दाखले आणि लाभाचे वाटप करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता महापालिकेच्या वतीने निगडी येथे उभारण्यात आलेल्या श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरणही करण्यात येणार आहे.
राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे उपस्थित राहणार आहेत.
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप तसेच विविध दाखल्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी थेरगाव येथील पदमजी पेपर मिलजवळ भव्य मंडप उभारण्यात आला असून त्यात विविध कक्ष तयार करण्यात आले आहेत. नागरिकांना यावेळी उत्पन्नाचा दाखला, नवीन मतदार नोंदणी, रहिवासी दाखला, सातबारा, आठ अ, हवेली तालुक्यातील रहिवाशांकरिता जातीचा दाखला, वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्व दाखला, 33 टक्के महिला आरक्षण दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला दिला जाणार आहे. आधार कार्डमधील नवीन दुरूस्ती व अद्यावत करणे, मतदार ओळखपत्राची आधार कार्डशी जोडणी करणे, शिधापित्रकेवरील नाव कमी करणे, शिधापत्रिकेवरील नाव वाढविणे, संजय गांधी निराधार अनुदान योजना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचा दाखला, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचा (नॉन क्रिमीलिअर) दाखला देणे आदी सेवाही देण्यात येतील.
महापालिकेच्या समाजविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभांचे वितरण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत शहरातील मतिमंद, आत्ममग्न, मेंदूचा पक्षाघात झालेल्या व्यक्ती, बहुविकलांग व्यक्तींकरिता निरामय आरोग्य विमा योजना महापालिकेने सुरू केली आहे. अशी योजना राबविणारी पिंपरी चिंचवड ही महाराष्ट्रातील पहिली महापालिका ठरली असून या योजनेअंतर्गत लाभार्थी नागरिकांचा 500 रुपये वार्षिक विमा हफ्ता दरवर्षी महापालिका भरणार आहे. या माध्यमातून दिव्यांग नागरिकांना वार्षिक 1लाख रुपये रकमेपर्यंत वैद्यकीय उपचार घेता येतील.
दिव्यांग विद्यार्थ्यांना 12 वी नंतरचे वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी पदवीसारखे उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रथम वर्षासाठी 1 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या दिव्यांगत्वानुसार उपयुक्त साधने घेण्यासाठी लाभार्थींच्या गरजा आणि दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार 1 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य केले जाते. शिवाय दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी बँकेकडील मंजूर कर्जाच्या 50 टक्के अथवा 1 लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य महापालिका करत असते. महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत रामभाऊ म्हाळगी मुलींना तांत्रिक प्रशिक्षण किंवा अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी अर्थसहाय्यांतर्गत 7 हजार 500 रुपये अर्थसहाय्य केले जात आहे.
स्व. प्रमोद महाजन परदेशातील उच्चशिक्षण अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या युवतीस अर्थसहाय्य योजनेंतर्गत प्रथम वर्षासाठी 1 लाख 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जात आहे. ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ उपक्रमाअंतर्गत पहिली मुलगी किंवा पहिली मुलगी असताना दुसऱ्या मुलीवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी 10 हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जात आहे. सहा महिने पुर्ण झालेल्या महिला बचत गटांना 15 हजार रुपये अर्थसहाय्य केले जात आहे. या योजनेतील लाभार्थ्यांनादेखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभांचे वाटप करण्यात येणार आहे.
शालेय साहित्यापोटी पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 3500 रुपये तर पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 3700 रुपये यावर्षीपासून डीबीटीद्वारे पालकांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. दर्जेदार साहित्याचा बाजारभाव बघून ही रक्कम निश्चित करण्यात आली आहे. या योजनेद्वारे लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभाचे वाटप यावेळी केले जाणार आहे.