Chhatrapati Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुर्णाकृती पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळल्याने संतापाचा उद्रेक झाला आहे. राज्यात इतिहास संशोधकांपासून ते शिवभक्तांपर्यंत शिवरायांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकावर सडकून टीका केली आहे.
पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला!
संभाजीराजे यांनी ट्विट करत टीकास्त्र सोडलं आहे. संभाजीराजे यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला! मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार! आता त्याठिकाणी पुन:श्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे. पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या इर्ष्येत परत काही गडबड करू नये. उशीर होऊदे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे.
'कंत्राटदार सरकार'ला महाराजांचा एक भक्कम पुतळा उभारता आला नाही
विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधलेले किल्ले अजूनही भक्कम आहेत आणि 'कंत्राटदार सरकार'ला महाराजांचा एक भक्कम पुतळा उभारता आला नाही, हा यांच्या कारभाराचा हिशेब आहे. "महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या महाराजांचा पुतळा नेमका कुणाच्या मार्गदर्शनाखाली तयार केला गेलाय? हा पुतळा उभा आणि हातात म्यानातून उपसलेसी तलवार असलेलाच का आहे? कुणालाच या पुतळ्यामध्ये काहीच चुकीचं वाटत नाही का?" हे सर्व प्रश्न मी उद्घाटनानंतर उपस्थित केले होते. आज महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर त्या दिखावेगिरीचा पर्दाफाश झालाय. महाराज आम्हाला माफ करा.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते डिसेंबर महिन्यात 35 फुटी पुतळ्याचे उद्धाटन
दरम्यान, राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची हा पुतळा 35 फुटांचा होता. मालवणमधील तारकर्लीच्या समुद्रकिनारी नौदल दिनाच्या कार्यक्रमावेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण झाले होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना देशातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जातात. भारतीय नौदलाने देखील आपल्या ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा छापली आहे. या पार्श्वभूमीवर नौदलाच्या वतीने 4 डिसेंबर 2023 चा नौदल दिन छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निमित्ताने राजकोट किल्ल्यावर नौदल आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाला होता.
इतर महत्वाच्या बातम्या