पुणे : शैक्षणिक आणि सांस्कृतिक पंढरी असलेल्या पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. कधी अपघात, कधी ड्रग्ज, कधी महिलांवरील अत्याचार तर कधी कोयता गँगची दहशत अशा घटनांनी पुणे शहर हादरलं आहे. त्यातच, रविवारी चक्क पोलिस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली. पुण्यात रविवारी 2 तरुणांनी पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला केला, त्यात रत्नदीप गायकवाड हे सहायक पोलीस निरीक्षक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर गायकवाड यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची तब्येत चांगली आहे. गायकवाड हे रुग्णालयात असताना सुद्धा त्यांनी, सर मला लवकर बरं व्हायचं आहे, त्यांना पकडायच आहे, अशी कर्तव्यदक्ष हिम्मत दाखवतात. 


पुण्यातील (Pune) वानवडी हद्दीत काल 2 तरुणांनी वानवडी पोलीस (Police) ठाण्याच्या अधिकाऱ्यावरच हल्ला केला. ही घटना घडताच पोलिसांची विविध पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली होती. त्यामध्ये सोलापूर (Police) पोलिसांची मदत घेण्यात आली आणि त्यांना वरवडे टोल नाक्यावरुन ताब्यात घेण्यात आलं. निहाल सिंह टाक आणि त्याच्या मित्राला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या दोघांवर याआधीही गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे ते अल्पवयीन असताना त्यांनी केलेले गुन्हे दाखल आहेत. मात्र, इथून पुढे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. 


गुन्हेगार सराईत


निहाल आणि त्याचा साथीदार हे दोघे हे पुणे शहरातील सराईत गुन्हेगार आहेत. या दोन्ही तरुणांवर या आधी चोरी, घरफोड्या, मारहाण करणे असे विविध 20 पेक्षा आधिक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर नुकतीच मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती, पण ते दोघेही सध्या जामिनावर बाहेर आले होते.


नेमकं काय घडलं 


पुण्यातील रामटेकडी परिसरात भांडण सुरु होतं. ते भांडण सोडवण्यासाठी आणि त्यातील एका टोळीतील तरुणाला पकडण्यासाठी पोलीस गेले होते. त्यावेळी टोळक्यानं थेट पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात हल्ल्यात पोलीस अधिकारी रत्नदीप गायकवाड जखमी झाले. ते वानवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आहेत. त्यांच्यावर टोळक्यानं कोयत्यानं हल्ला केल्यानं पोलिस खात्यात खळबळ उडाली. दरम्यान, आरोपींना सोलापूरहून अटक करण्यात आली आहे. 


हेही वाचा


महिला सरपंचाकडून आत्मदहनाचा प्रयत्न,बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर ओतलं पेट्रोल