Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरच्या पैठण (Paithan) खुल्या कारागृहातील एका कैद्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) भोगणाऱ्या एका कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. रुबी भोलानाथ भूमीज (वय 53 वर्षे, रा. मोहारील, ता. पूर्वस्थळी, जि. वर्धमान, पश्चिम बंगाल) असे मृत झालेल्या कैद्याचे नाव आहे. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (26 जून) सायंकाळी प्रार्थनेसाठी कारागृहातील मंदिराच्या प्रांगणात कैदी जमले होते, तेव्हा तेथे रुबी भूमीजला हृदयविकाराचा झटका येऊन तो कोसळला. कारागृह अधीक्षक धनसिंग कवाळे यांनी त्याला तातडीने पैठण येथील शासकीय रुग्णालयात हलवले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची माहिती त्याच्या पत्नीस देण्यात आल्यानंतर त्याचे नातेवाईक पैठण येथे हजर झाले. तर रुबी भूमीजला खुनाच्या आरोपाखाली मुंबई शहर सत्र न्यायालयाने 2009 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. वडाळा टीटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भूमीजने हा गुन्हा केला होता. दरम्यान, मार्च महिन्यात त्याला नाशिक कारागृहातून पैठण येथील खुल्या कारागृहात वर्ग करण्यात आले होते.


चांगल्या वागणुकीमुळे पैठणच्या खुल्या कारागृहात हलवण्यात आले


खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींची चांगली वागणूक असल्यास त्यांना खुल्या कारागृहात पाठवण्यात येते. पैठण येथील खुल्या कारागृहात देखील राज्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाणे हद्दीतील गुन्ह्यातील आरोपींना त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे पाठवले जाते. दरम्यान नाशिक कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या रुबी भूमीजला त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे मार्च महिन्यात पैठणच्या खुल्या कारागृहात हलवण्यात आले होते. त्याची या ठिकाणी देखील वागणूक चांगली होती. तर सोमवारी सायंकाळी प्रार्थनेसाठी कारागृहातील मंदिराच्या प्रांगणात कैदी जमले असताना रुबी भूमीज देखील तिथे उपस्थित होता. मात्र त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तो कोसळला. त्याला पैठणच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार सुरु असतानाचा त्याचा मृत्यू झाला. 


जानेवारी महिन्यात देखील एका कैद्याचा मृत्यू


दरम्यान जानेवारी महिन्यात देखील पैठण खुल्या कारागृहातील एका कैद्याचा मृत्यू झाला होता. पत्नीच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या या बंदिस्त कैद्याचा आजारपणाने ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे समोर आले होते. दिलीप नरसिंग सोनवणे (वय 52 वर्षे, रा. वसमत) असे मयत कैद्याचे नाव होते. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील दिलीप नरसिंग सोनवणे याने आपल्याच पत्नीचा खून केला होता. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी त्याला अटक करुन, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने अंतिम निकाल देताना दिलीप सोनवणे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे नरसिंग सोनवणे हा हर्सूल येथील कारागृहात त्यांच्या पत्नीच्या खून प्रकरणात 22 जुलै 2019 पासून जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. मात्र त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे त्याला पैठण खुल्या कारागृहात हलवण्यात आले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad News : पत्नीच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याचा मृत्यू; पैठण खुल्या कारागृहातील घटना