Aurangabad GST Scam : डिसेंबर 2022 मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) जीएसटी (GST) विभागाने केलेल्या एका कारवाईत बनावट बिलांचा महाघोटाळा समोर आला होता. या घोटाळ्यात 35 बनावट कंपन्यांच्या माध्यमातून 500 कोटींची बनावट बिलं समोर आली होती. दरम्यान याचा तपास करत असताना आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. या जीएसटी घोटाळ्याचा पैसा टेरर फंडिंगसाठी (Terror Funding) वापरण्यात आल्याचा संशय जीएसटी विभागाला असून, त्या दिशेने तपास करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात संयुक्तिक तपास करण्याबाबत जीएसटी विभागाने पोलिसांना पत्र लिहिले आहे.
काय आहे प्रकरण?
बोगस कंपन्या स्थापन करुन इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेत 1 हजार कोटींपेक्षा अधिकचा घोटाळा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश संभाजीनगरच्या स्टेट जीएसटी विभागाने केला होता. या प्रकरणाची व्याप्ती आता हजार कोटीच्या पुढे आणि गुजरातसह देशातल्या विविध राज्यांत असल्याची शक्यता आहे. दरम्यान या कारवाईनंतर जीएसटी विभागाच्या कोठडीत असलेले आरोपी फैजल अब्दुल गफार मेवावाला आणि मोहम्मद अजिज यांची चौकशी सुरु आहे. ज्यात या दोघांनी 35 बनावट कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास 500 कोटींची बनावट बिले उघड केल्याची माहिती समोर आली आहे. आता या घोटाळ्याची व्याप्ती तब्बल 2 हजार कोटींच्या घरात असल्याची शक्यता आहे. मात्र घोटाळ्यातील पैसा हा टेरर फंडिंगसाठी वापरण्यात आल्याचा संशय जीएसटी विभागाला आहे. त्यामुळे आता त्या दृष्टीने तपास करण्यात येत आहे.
फरहत एन्टरप्राईजेस या नावाने हा सर्व प्रकार सुरु होता. आरोपी फैजल आणि अजिज हे सगळं करत होते. त्यांच्या घरावर छापा टाकला त्यावेळी 30 आधार कार्ड, पॅन कार्ड, 30 हून अधिक सीम कार्ड्स असं आढळून आले होते. इतकंच नाही तर त्याच्या लॅपटॉपवरुन मिळालेल्या प्राथमिक माहितीत त्यांनी 500 कोटींहून अधिक रकमेचे बिल राज्यात वितरित केली असून, अनेक बड्या कंपन्यांचा सहभाग असल्याचंही दिसून आले आहे.
पहिल्यांदाच जीएसटी विभागासह पोलीस संयुक्तिक तपास करत आहेत
जीएसटी बिलांचा 500 कोटींपेक्षा अधिकचा घोटाळा समोर आल्याने मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान याचा तपास करत असताना या घोटाळ्यातील पैसा टेरर फंडिंगसाठी वापरण्यात आल्याचे समोर आल्याने जीएसटी विभागाने संयुक्तिक तपास करण्यासाठी पोलिसांना पत्र लिहिले होते. दरम्यान यानंतर आता पोलीस आणि जीएसटी विभाग संयुक्तिक तपास करत आहेत. विशेष म्हणजे राज्यात पहिल्यांदाच जीएसटी विभागासह पोलीस संयुक्तिक तपास करत असल्याचे समोर आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: