Aashadhi Wari 2023: विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन आणि शेकडो मैलांची पायपीट करीत आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे (Pandharpur) निघालेले पालखी सोहळे आज पंढरीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत लाखोंचा महासागर पंढरीत दाखल होणार आहे. आळंदी येथून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराज, देहू येथून निघालेले जगतगुरु तुकोबाराय, सासवड येथून निघालेले संत सोपानदेव, चांगा वटेश्वर यांच्यासह अनेक पालखी सोहळे काल अखेरच्या मुक्कामासाठी वाखरी येथील पालखी तळावर विसावले होते. 


आज सकाळी या संताना निमंत्रण देण्यासाठी पंढरपूर येथून संत नामदेव राय पालखी सोहळा पंढरपूरच्या वेशीवर विसावा येथे येऊन थांबणार आहे. याचसोबत या सर्व संतांच्या सोबत येण्यासाठी 2 दिवसांपूर्वी दाखल झालेला आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळा देखील विसाव्याकडे जाणार आहे. पैठण येथून निघालेला संत एकनाथ महाराज पालखी सोहळा आणि त्रंबकेश्वर येथून निघालेला संत निवृत्तीनाथ यांचा पालखी सोहळा देखील परंपरेनुसार विसाव्याजवळ दाखल होणार आहेत. 


दुपारी पहिल्यांदा सोपानकाकांचा आणि  त्यानंतर इतर पालखी सोहळे पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतील. यानंतर जगतगुरु तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे निघेल. सर्वात शेवटी दुपारी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल. माउली सोहळ्यातील पादुका वाखरीच्या ओढ्याजवळ मानकरी भाटे यांच्या रथात ठेवण्यात येतील. यानंतर इतर सर्व पालखी सोहळे विसाव्याजवळून पंढरपुरात प्रवेश केल्यावर पहिल्यांदा मानाच्या पालखी सोहळ्यापैकी संत नामदेव महाराजांचं पालखी सोहळा पंढरपूरकडे विसाव्यापासून प्रस्थान ठेवेल. त्यानंतर संत मुक्ताबाई, संत सोपानकाका, संत निवृत्तीनाथ आणि संत एकनाथ महाराज यांच्या पालख्या पंढरपुरात प्रवेश करतील. यानंतर जगतगुरु तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा विसावा येथे आल्यावर सोहळ्यातील शेवटचं उभं रिंगण होऊन हा पालखी सोहळा शहरात प्रवेश करेल. भाटे यांच्या रथातून आलेला संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा विसाव्याजवळ आल्यावर येथे या सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण होईल. येथे मानकरी शितोळे सरकार यांच्या गळ्यात माउलींच्या पादुका दिल्या जातील आणि माउलींचा पालखी सोहळा ज्ञानेश्वर मठाकडे प्रस्थान ठेवेल. हे सर्व मानाचे पालखी सोहळे शहरात दाखल होताना त्यांच्यासमवेत लाखोंचा भक्तिसागर देखील शहारत दाखल होणार आहे. 


मुख्यमंत्री आज दुपारी पंढरीत येणार


आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) शासकीय महापूजेसाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मुंबई येथून विमानाने सोलापूरला येऊन तेथून हेलिकॉप्टरने दुपारी चार वाजता पंढरपूरमध्ये (Pandharpur) दाखल होणार आहेत. मुख्यमंत्री दुपारी चार वाजता शासकीय विश्रामगृहावर पोहोचल्यावर येथे पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या पर्यावरण वारीचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर सोलापूर वनविभागाने तयार केलेल्या कॉफी टेबल बुक्या पुस्तकाचे प्रकाशन होईल. सायंकाळी पाच वाजता पंचायत समिती येथे आषाढी यात्रा स्वच्छता दिंडीचा समारोप होणार आहे. यानंतर पुन्हा मुख्यमंत्री विश्रामगृहावर येणार असून यानंतरचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे.


उद्या पहाटे म्हणजे 29 जूनच्या पहाटे मुख्यमंत्री विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी मंदिरात जाणार आहेत. शासकीय पूजेनंतर मंदिर समितीकडून होणार सत्कार स्वीकारून पहाटे साडे चार वाजता विश्रामगृहाकडे निघणार आहेत. 29 जून रोजी सकाळी 10 वाजता विश्रामगृह येथे अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम होणार आहे . सकाळी अकरा वाजता तीन रस्ता येथे आषाढी एकादशी निमित्त होणाऱ्या अन्नदान कार्यक्रमात उपस्थिती लावणार आहेत. दुपारी आडे अकरा वाजता तीन रस्ता येथे सुरु असलेल्या महाआरोग्य शिबिरात जाऊन वारकऱ्यांशी संवाद आणि महाशिबीराची पाहणी करणार आहेत. दुपारी बारा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या कृषी प्रदर्शनाला भेट देणार असून तेथून पुन्हा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने सोलापूरकडे रवाना होतील.