मुंबई : देशातील बळीराजासह नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा मान्सून केरळमध्ये वेळेत दाखल होणार आहे. 1 जून रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.


दरम्यान 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल तर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापण्याचा अंदाज आहे, अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.


पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. माधवन राजीवन यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "यंदा मान्सून वेळ म्हणजेच 1 जून रोजी दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हा प्रारंभिक अंदाज आहे. भारतीय हवामान विभाग 15 मे आणि 31 मे रोजी पावसाचा अधिकृत अंदाज वर्तवेल."






मागील दोन वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबला होता. मात्र, सध्या अशी कोणतीही चिन्ह दिसत नसल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे केरळात जर मान्सून वेळेवर दाखल झाला तर महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे.