चंद्रपूर - ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एका हत्तीने केलेल्या हल्ल्यात माहुताचा मृत्यू झाला आहे. जानकीराम मसराम (वय 45 वर्ष)या घटनेत मृत्यू झालेल्या माहुताचे नाव आहे. या घटनेमुळे वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मोहुर्ली येथे घडली.

चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सफारी आणि इतर कामासाठी काही हत्ती मोहर्ली येथील कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे. मागील काही दिवसांत या हत्तीवरुन सफारी केली जायची. सद्यस्थितीत एका मादी हत्तीला एक वर्षाचे पिल्लू असून, दुसरी मादी हत्ती गरोदर आहे. या काळात मादी हत्ती ही नर हत्तीला जवळ येऊ देत नाही. त्यामुळे गजराज नावाचा नर हत्ती बिथरला असावा, असे मत व्यक्त केले जात आहे.

आज दुपारी अचानक अमोल मंगाम यांच्यावर गजराज चाल करुन गेला. अमोल यांना वाचविण्याच्या प्रयत्नात असताना गजराज हत्तीने माहुताला सोंडेत पकडून जमिनीवर आदळले, वर पायदळी देखील तुडवले. यामुळे मसराम यांचा जागीच मृत्यू ओढविला आहे. हे प्रत्यक्ष घटनास्थळ व्याघ्रप्रकल्पाच्या मोहर्ली या प्रसिद्ध प्रवेशद्वारा शेजारी आहे. बिथरलेला हत्ती सायंकाळी 6 वाजेपर्यंत कुणालाही जवळ येऊ देत नव्हता, असे वनाधिकार्‍यांनी सांगितले.

ताडोबातील हत्ती सफर -
शक्ती आणि सौंदर्याचे प्रतीक असलेल्या वाघांच्या मुक्त संचारामुळे ताडोबाला राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान आहे. या प्रकल्पात वाघांशिवाय बिबट, गवा, सांबर, चितळ, रानडुक्कर हे प्राणी प्रामुख्याने आढळतात. 1 मार्च ते 31 मे या तीन महिन्यांच्या कालावधीत ताडोबात पर्यटकांची गर्दी असते. काही वर्षांपासून ताडोबामध्ये परदेशी आणि देशातील पर्यटकांसाठी हत्ती सफारी सुरु करण्यात आली होती.

संबंधित बातम्या -

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मीरा वाघिणीचा मृत्यू

चंद्रपुरातील ताडोबा अभयारण्याच्या कोअर झोनमध्ये वाघिणीची शिकार