चंद्रपूर : चंद्रपुरातील ताडोबा अभयारण्याच्या कोअर झोनमध्ये वाघिणीची शिकार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिकाऱ्यांनी लावलेल्या तारेत अडकून वाघिणीचा मृत्यू झाला आहे. इतिहासात पहिल्यांदाच ताडोबा अभयारण्यात अशी घटना घडल्यानं वाघांच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.



जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोनमधील खातोडा गेट परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ताडोबातील हा भाग सामान्य लोकांसाठी पूर्णपणे प्रतिबंधित असून या ठिकाणी कोणाला पाय ठेवण्याची देखील परवानगी नाही.


वनविभागाच्या परवानगीने या गेटवरून फक्त पर्यटकांच्या गाड्या सोडल्या जातात. एवढी सुरक्षाव्यवस्था असताना देखील या भागात शिकाऱ्यांनी शिरकाव केला आणि तारांचे फासे लावले. ज्यामध्ये अडकून दोन वर्षीय वाघिणीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.


या घटनेनंतर वन्यजीव प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोनमध्ये जर शिकारी शिरकाव करुन वाघाची शिकार करत असतील, तर या पेक्षा दुर्दैवी घटना असू शकत नाही, अशी भावना वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केली. ताडोबा प्रशासनाने पर्यटनापेक्षा वाघांच्या संरक्षणाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.