चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मीरा वाघिणीचा मृत्यू झाला आहे. या वाघिणीचं वय अंदाजे दोन वर्ष होतं. ताडोबा तलाव परिसरात आज सकाळी तिचा मृतदेह आढळला. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सर्वात प्रसिद्ध वाघीण असलेल्या माया वाघिणीची ती बछडी होती.

दोन दिवसांपूर्वी ताडोबा तलाव परिसरात माया आणि तिची दोन पिल्लं रानगव्याची शिकार करत होते. या दरम्यान रानगव्याची शिंगं मीराच्या छाती आणि पोटात खुपसली. ही माहिती मिळताच ताडोबा प्रशासनाने तिच्या जखमा किती गंभीर आहे याचा अंदाज काढण्यासाठी तिची रेकी सुरु केली. मात्र या बाबत कुठला निष्कर्ष काढण्याआधीच तिचा मृत्यू झाला. ताडोबा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी ताडोबा तलाव परिसरात तिचा मृतदेह आढळून आला आहे.

प्रसिद्ध माया वाघिणीची बछडी

ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा जगातील सर्वात प्रसिद्ध असलेला व्याघ्र प्रकल्प असून देश विदेशातील हजारो पर्यटक या प्रकल्पाला दरवर्षी भेट देतात. माया वाघीण ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सर्वांच्या परिचयाची असून ताडोबा तलाव परिसरात तिचे वास्तव्य आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील अतिशय धिप्पाड अशा मटकासूर या वाघापासून मायाला अंदाजे दोन वर्षांपूर्वी मीरा आणि सूर्या नावाची दोन पिल्लं झाली. मटकासूर हा देखील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील अतिशय सेलिब्रिटी वाघ आहे. सेलिब्रिटी आई-वडील असल्यामुळे मीरा आणि सूर्या ही पिल्लं देखील अवघ्या काही महिन्यात प्रसिद्ध झाली. नल्ला मुथ्थु हा जगप्रसिध्द वाईल्ड लाईफ व्हिडीओग्राफर नॅशनल जिओग्राफी चॅनलसाठी माया आणि तिच्या या दोन पिल्लांवर एक डॉक्युमेंट्रीही तयार करत आहे. अलीकडेच त्याचा एक टीजर जारी करण्यात आला आहे. मायाची क्रेझ बघून ताडोबात तिची प्रतिकृती बसवण्यात आली आहे.

मीराच्या मृत्यूने हळहळ

मीराचा मृत्यू हा जगभरातील तिच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. खरं म्हणजे माया आणि तिच्या बछड्यांचा स्वभाव हा अतिशय धीट होता. ताडोबा तलाव परिसरात या तिघांची अक्षरश: दहशत आहे. सांबर, नीलगाय या सारख्या मोठ्या प्राण्यांसोबतच अस्वल आणि रानगव्यासारखे सावज देखील हे तिघे टिपायचे. 800 ते 1000 किलोच्या रानगव्याची शिकार करणं हे अतिशय अवघड काम आहे. गेल्या एका वर्षापासून माया तिच्या दोन्ही पिल्लांना शिकारी शिकवत होती. शिकारीचे हे ट्रेनिंग सेशन पाहण्याचे भाग्य गेल्या एक वर्षात अनेक पर्यटकांना मिळालं. त्यांची एक छलक पाहण्यासाठी तासन् तास लोकं ताडोबात थांबायचे. पण दोन वर्षांचीच असल्याने शिकारीचं तंत्र ती पूर्णपणे शिकलेली नसावी. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.