Chandrakant Patil : महाविकास आघाडी सरकारमुळे मराठी अधिकाऱ्यांचे नुकसान होत असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. राज्य सरकारच्या सेवेतील अधिकाऱ्यांना आयएएस दर्जा देण्यासाठीच्या प्रक्रियेतील बैठकीस राज्यातील तीन वरिष्ठ अधिकारी वेळेत पोहोचले नाहीत. त्यामुळे मराठी अधिकाऱ्याची आयएएस होण्याची संधी हुकल्याची घटना धक्कादायक आहे. आघाडी सरकारच्या बेफिकीरमुळे मराठी अधिकाऱ्यांचे नुकसान होत आहे. मराठीच्या मुद्द्यावर आवाज उठविणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेचे याबद्दल काय म्हणणे आहे, असा सवाल यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना नामनिर्देशनाने आयएएस दर्जा मिळविण्याची संधी असते. कामाचे चांगले वार्षिक अहवाल असलेल्या अधिकाऱ्यांना परीक्षा आणि मुलाखतीचे टप्पे ओलांडून आयएएस होता येते. त्यासाठी राज्याकडून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावे लागतात आणि उमेदवारांच्या मुलाखतीच्या टप्प्यात केंद्रातील अधिकाऱ्यांसोबत राज्यातील सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना सहभागी व्हावे लागते. डिसेंबर २०२१ मध्ये अशा एका संधीच्या वेळी राज्यातील मुख्य सचिव आणि दोन वरिष्ठ सचिव मुलाखतीच्या टप्प्यासाठी वेळेत गेले नाहीत व त्यामुळे संबंधित मराठी अधिकाऱ्याची आयएएस होण्याची संधी हुकली. आता पुन्हा ही प्रक्रिया पार पडेल तोपर्यंत थांबावे लागेल. महाविकास आघाडी सरकारचा एकूण कारभार बेफिकीरीचा आहे आणि या सरकारचे अधिकाऱ्यांवर नियंत्रण नाही यामुळे ही समस्या निर्माण झाली, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना आयएएस अधिकारी होण्याची संधी मिळण्यासाठी मुळात राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे वेळेत प्रस्ताव पाठविणे आवश्यक असते. अशा पात्र अधिकाऱ्यांचे २०२० चे प्रस्ताव २०२१ संपले तरीही पाठविले नसल्याची आपली माहिती आहे. अशा दिरंगाईमुळे मराठी अधिकाऱ्यांना संधी मिळण्यास विलंब होतो. याची जबाबदारी असलेल्या सचिवांवर महाविकास आघाडी सरकारचे नियंत्रण नाही आणि आघाडी सरकारच्या बेफिकीरीचाही वरिष्ठ अधिकारी फायदा उठवत आहेत.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live