पंढरपूर : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेला सोडण्यात आलेली जागा मुंबई शहरातील जागेच्या बदल्यात 'फिक्स' झाली होती, असा गंभीर आरोप माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र मौन साधलं आहे. यावरुन वक्तव्य भाजपच्या अडचणी वाढवणारे आहे का? असा सवाल उपस्थित होतोय. विधानसभा निवडणुकीत काही जागांवर पक्षाने फिक्सिंग केल्याचा गंभीर आरोप संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला होता. याचा रोख थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्याकडे होता. आज सांगोला येथे जिल्हा भाजप कार्यकारिणी ठरविण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमदार खासदार यांची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांना विचारले असता त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार देत निलंगेकर यांच्या वक्तव्याबाबत आपणास माहिती नसल्याचे सांगत वेळ मारून नेली.
दरम्यान, लातूर ग्रामीणबाबत संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया देताना अमित देशमुखांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले की, जुन्या कढीला उत आणत आहेत. युतीतील जागा वाटपात तो बदल झाला आहे. त्यांचा रोख भाजपातील कोणत्या नेत्यांबाबत आहे हे त्यांनी स्पष्ट करावे, असं अमित देशमुखांनी म्हटलं आहे.
लातूर ग्रामीणची जागा अमित देशमुख यांना देऊन देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीचा खून - संभाजी पाटील-निलंगेकर
संभाजी पाटील-निलंगेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेस आमदार अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख यांच्या राजकीय व्यवहाराबद्दल खळबळजनक गौप्यस्फोट केला. लातूर ग्रामीणची जागा अमित देशमुख यांना देऊन देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीचा खून केला. ही जागा भाजपकडे होती. ऐनवेळी ही जागा शिवसेनेला सुटली. या जागेसाठी शिवसेनेने दिलेला उमेदवार प्रचाराला फिरकला देखील नाही. हे राजकारणातले सेटिंग आहे. अमित देखमुख यांचे बंधू धीरज देशमुख यांनी ही जागा लढवली आणि विजयी झाले. मात्र, हा विजय कमालीचा एकतर्फी होता. फडणवीसांनी लातूर ग्रामीणची भाजपची विनिंग सीट शिवसेनेला सोडून धीरज देशमुख यांना आमदार केलं. ही राजकारणातली सर्वात मोठी फिक्सिंग असल्याचा गंभीर आरोप निलंगेकर यांनी केला होता.
..त्यावेळी फडणवीस यांना विरोध करणारा मी एकमेव आमदार होतो : निलंगेकर
ज्या लोकांनी त्यावेळेस दावा केला की आम्ही घरी बसून विजयी झालो (देशमुख) त्यांनी लोकशाहीचा खुन केला. लातूर जिल्ह्यातील सातच्या सात जागा मी निवडून आणला असत्या. देवेंद्र यांच्या त्या गोष्टींना विरोध करणारा मी एकमेव आमदार होतो, पुढेही मी हेच करणार असल्याचा निर्धार निलंगेकर यांनी व्यक्त केला. त्या जागेवर नोटाला सर्वात जास्त मतदान झाले असून मुंबईतल्या एका जागेसाठी हे फिक्सिंग केल्याचा आरोपही त्यांनी केला.
काय होती त्यावेळची परिस्थिती?
लातूर ग्रामीण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख याचे चिरंजीव धीरज देशमुख विजयी झाले आहेत. त्यांची लढत नेमकी कोणाशी होती हे मात्र मतदानाच्या आकडेवरुन स्पष्ट होत नाही. कारण धीरज देशमुख यांच्यानंतर नोटाला मतदारांनी सर्वाधिक मतदान केलं आहे. मतदारांनी तब्बल 26,899 मतं याठिकाणी नोटाला दिली आहेत. लातूर ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसचे धीरज देशमुख 1 लाख 31 हजार 321 मतांनी विजयी झाले. त्यानंतर नोटाला 26 हजार 899 मतं मिळाली आहेत. मग शिवसेनेच्या सचिन देशमुख यांना 13 हजार 113 मतं मिळाली तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बळीराम डोने यांना येथे 12 हजार 670 मतं मिळाली आहेत. मात्र याठिकाणी नोटाला एवढी मतं मतदारांनी का दिली? याबाबत विचार करणे गरजेचं आहे.
Assembly Elections | लातूर ग्रामीण जागेसाठी विधानसभा निवडणुकीत फिक्सिंग, संभाजी निलंगेकरांचा आरोप