सातारा : दुसऱ्यांचे हिरावून नको तर आमच्या हक्काचं आरक्षण द्या, अशी मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. तसंच काम नसल्याने मराठा समाजातील मुलांची लग्न होत नाहीत, असंही ते म्हणाले. तर मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होत आहे, त्यामुळे राजकीय अभिनिवेश विसरुन मराठा समाजाने एकता दाखवायला हवी असं भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं आहे. साताऱ्यात आज नरेंद्र पाटील यांच्या अण्णासाहेब पाटील फाऊंडेशनची स्थापना झाली. या कार्यक्रमात भाजप खासदार उदयनराजे आणि भाजप आमदार शिवेंद्रराजे उपस्थित होते. दोन्ही राजेंनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका यावेळी स्पष्ट केली.


"भेदभाव करणं हे लोकप्रतिनिधींच्या पदाला शोभत नाही. समाजाच्या मागण्या काय आहेत याचा विचार केला पाहिजे. दुसऱ्यांचं हिरावून आम्हाला आरक्षण देऊ नका. त्यांना न्याय दिला मग आमच्यावर अन्याय का? एवढं आंदोलन सुरु असताना जाणीवपूर्व केल्यासारखंच दिसून येतं, का ते माहित नाही," असं उदयनराजेंनी यावेळी म्हटलं. तसंच नरेंद्र पाटील यांच्या कामात आम्ही कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.


लोकांचा उद्रेक झाला तर तो थांबणार नाही : उदयनराजे
उदयनराजे पुढे म्हणाले की, "आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे असं मी वेळोवेळी बोललो आहे. मराठा समाजाबाबत भेदभाव करणं लोकप्रतिनिधींना शोभत नाही. सगळ्या मतदारसंघात मराठा समाज आहे ना? मग त्यांना न्याय दिला तर आमच्यावर अन्याय का? आम्हाला कुणाच्या ताटातील काही नको. मराठा समाजातील मुलांना जास्त मार्क मिळाले असतील आणि त्यापेक्षा कमी मार्क मिळलेल्या मुलांना संधी मिळत असतील तर हा अन्याय नाही का? निवडणुका आणि सत्ता दर पाच वर्षाला येत असतात. तुमच्या हक्कासाठी जे पाठीशी राहतात त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे. सुप्रीम कोर्टात वकील वेळेवर हजर राहत नाहीत, हे जाणीवपूर्वक करतात असं वाटतं. राजकारण्यांनो लोकांचा उद्रेक झाला तर तो थांबणार नाही. आज पुढची पिढी आपल्याकडे आशेने बघतेय, याचा विचार केला पाहिजे. कुठेतरी राजकारण थांबवून समाजासाठी जनाची नाही तर मनाची लाज राखली पाहिजे. उद्या तुमच्या घरातील मुलं देखील तुम्हाला विचारतील की मराठा समाजासाठी हे का नाही केलं? लोकांच्या भावना समजून घेत नसाल तर काय बोलायचं"


समाज म्हणून एकत्र येणं गरजेचं : शिवेंद्रराजे
आरक्षणाचा मुद्दा येतो तेव्हा सगळ्या राजकीय चौकटी बाजूला ठेवून समाज म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे. तरच खऱ्या अर्थाने आरक्षण किंवा लढा आपण जिंकू असा विचार समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांनी करणं गरजेचं आहे. राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते, किंवा समाजातील विचारवंतांनी एकत्र आलं पाहिजे.