लातूर : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेला सोडण्यात आलेली जागा मुंबई शहरातील जागेच्या बदल्यात 'फिक्स' झाली होती, असा गंभीर आरोप माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. संभाजी पाटील-निलंगेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेस आमदार अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख यांच्या राजकीय व्यवहाराबद्दल  खळबळजनक खुलासा केला आहे.


लातूर ग्रामीणची जागा अमित देशमुख यांना देऊन देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीचा खून केला. ही जागा भाजपकडे होती. ऐनवेळी ही जागा शिवसेनेला सुटली. या जागेसाठी शिवसेनेने दिलेला उमेदवार प्रचाराला फिरकला देखील नाही. हे राजकारणातले सेटिंग आहे. अमित देखमुख यांचे बंधू धीरज देशमुख यांनी ही जागा लढवली आणि विजयी झाले. मात्र, हा विजय कमालीचा एकतर्फी होता. फडणवीसांनी लातूर ग्रामीणची भाजपची विनिंग सीट शिवसेनेला सोडून धीरज देशमुख यांना आमदार केलं. ही राजकारणातली सर्वात मोठी फिक्सिंग असल्याचा गंभीर आरोप निलंगेकर यांनी केला आहे.


..त्यावेळी फडणवीस यांना विरोध करणारा मी एकमेव आमदार होतो : निलंगेकर
ज्या लोकांनी त्यावेळेस दावा केला की आम्ही घरी बसून विजयी झालो (देशमुख) त्यांनी लोकशाहीचा खुन केला. लातूर जिल्ह्यातील सातच्या सात जागा मी निवडून आणला असत्या. देवेंद्र यांच्या त्या गोष्टींना विरोध करणारा मी एकमेव आमदार होतो, पुढेही मी हेच करणार असल्याचा निर्धार निलंगेकर यांनी व्यक्त केला. त्या जागेवर नोटाला सर्वात जास्त मतदान झाले असून मुंबईतल्या एका जागेसाठी हे फिक्सिंग केल्याचा आरोपही त्यांनी केला.


काय होती त्यावेळची परिस्थिती?
लातूर ग्रामीण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख याचे चिरंजीव धीरज देशमुख विजयी झाले आहेत. त्यांची लढत नेमकी कोणाशी होती हे मात्र मतदानाच्या आकडेवरुन स्पष्ट होत नाही. कारण धीरज देशमुख यांच्यानंतर नोटाला मतदारांनी सर्वाधिक मतदान केलं आहे. मतदारांनी तब्बल 26,899 मतं याठिकाणी नोटाला दिली आहेत.


लातूर ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसचे धीरज देशमुख 1 लाख 31 हजार 321 मतांनी विजयी झाले. त्यानंतर नोटाला 26 हजार 899 मतं मिळाली आहेत. मग शिवसेनेच्या सचिन देशमुख यांना 13 हजार 113 मतं मिळाली तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बळीराम डोने यांना येथे 12 हजार 670 मतं मिळाली आहेत. मात्र याठिकाणी नोटाला एवढी मतं मतदारांनी का दिली? याबाबत विचार करणे गरजेचं आहे.


Assembly Elections | लातूर ग्रामीण जागेसाठी विधानसभा निवडणुकीत फिक्सिंग, संभाजी निलंगेकरांचा आरोप