रत्नागिरी/रायगड : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही मंत्रीमहोदयांनी मुंबई-गोवा हायवेचा पाहणी दौरा केला आणि लवकरच खड्डे बुजवण्याचं आश्वासन दिलं. पण या मार्गाची आजची परिस्थिती पहता हे आश्वासन हवेतच विरण्याची शक्यता जास्त आहे.


गेल्या तीन महिन्यात मुंबई-गोवा हायवेवर बहुतांश ठिकाणी खड्डयांचं साम्राज्य पसरलं आहे. गेल्या काही वर्षातील प्रत्येक पावसाळ्यातील ही अवस्था. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी एखादा मंत्री रस्त्याची पाहणी करतो आणि कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची एखादी तारीख जाहीर करतो. ही जणू एक प्रथाच आहे.

यंदाही सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट मुंबई ते सिंधुदुर्ग दौरा केला आणि 9 सप्टेंबरपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं. पण रायगड जिल्ह्यातील पळस्पे ते इंदापूर मार्गाची अवस्था पाहिली तर या आश्वासनाबाबत थोडी साशंकता वाटते.

पळस्पे ते इंदापूर दरम्यानच्या मार्गातील कर्नाळा अभयारण्य, पेण ते वडखळ दरम्यानचा टप्पा, नागोठणे नजीकचा मार्ग, वाकण ते सुकेळी खिंड, खांब गावानजीकचा रस्ता अशा बहुतांश मार्गाची अवस्था आजही बिकट आहे. या संपूर्ण मार्गावर पाऊस झाल्यास चिखल होतो, तर ऊन पडल्यास धुळ पसरत असल्याने दुचाकीस्वारांचे पुरते हाल होतात. यामुळे पेण ते कोलाड दरम्यानचे सुमारे 50 किलोमीटर अंतर गाठायला किमान दीड तासांचा अवधी लागत आहे.

येत्या दहा दिवसात मुंबई-गोवा हायवेवरील या टप्प्यातील खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण होणं काहीसं कठीण वाटत असून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मात्र खडडयातूनच प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे.

खड्डे बुजवण्याचं काम करणाऱ्या कंपन्यांना योग्य भाषेत समज देण्यात आली आहे. या कंपन्या आता कामाला लागल्या असल्याचं सांगत चंद्रकांत पाटील यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. चंद्रकांत पाटलांनी या हायवेवरुन दौरा करत असताना कित्येक महिने काम न केलेल्या कंपन्या आज दिवसभर रस्त्यावर काम करताना दिसल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मंत्र्यांच्या दौऱ्यापुरत्याच या कंपन्या रस्त्यावर नाहीत ना? असा सवालही लोकांच्या मनात येऊन गेला.

महामार्गावरील खड्डे बुजवण्याची जबाबदारी ज्यांची होती, त्या कंपन्यांनी बुजवले नाहीत, याबाबत मात्र सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी कंपन्यांचं नाव घेण्याचं टाळत समज दिली. ते काम करतील असं म्हणत वेळ मारुन नेण्याचाच प्रयत्न केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था पाहण्यासाठी दिवसभर प्रवास केला. त्यांच्या या दौऱ्यातून नेमकं काय निष्पन्न झालं, हे पुढील दहा दिवसात स्पष्ट होईल.