मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, सरसकट कर्जमाफीला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर ‘सरसकट’, ‘तत्वत:’ आणि ‘निकष’ या तीन शब्दांवरुन सोशल मीडियापासून ते अगदी शरद पवारांपर्यंत सर्वांनीच टीका केली. त्यामुळे आज चंद्रकांत पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना या तिन्ही शब्दांचा अर्थ स्पष्ट केला.
‘सरसकट’ म्हणजे काय?
चंद्रकांत पाटील : ‘सरसकट’ म्हणजे एकरांची मर्यादा नाही. सर्व शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असतील. आधी 5 एकरापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 जूनला केली होती. त्यावर लोकांचं म्हणणं होतं की, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची लँड होल्डिंग कमी असते. मात्र, विदर्भ, मराठवाड्यात लँड होल्डिंग जास्त असते, परंतु उत्पादन जास्त नसतं. त्यामुळे सरसकट कर्जमाफीत जमिनीची मर्यादा नसेल.
‘तत्वत:’ म्हणजे काय?
चंद्रकांत पाटील : ‘तत्वत:’ म्हणजे सरसकट कर्जमाफी मान्य आहे. मात्र, त्याचा तपशील गोळा करुन कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणला जाईल. तपशील गोळा करण्यासाठी माझ्या (चंद्रकांत पाटील) अध्यक्षतेत समिती नेमण्यात आली आहे, ज्यामध्ये सरकारी अधिकारी असतील आणि शेतकरी संघटनांनी त्यांचे नेते द्यायचे आहेत. या समितीने संयुक्तरित्या विचारमंथन करायचंय. त्यानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेऊन, त्यांनाही यात समाविष्ट करुन निकष ठरवले जातील.
‘निकष’ म्हणजे काय?
चंद्रकांत पाटील : ‘निकष’ म्हणजे जसं क्रिमिलेयरमध्ये मर्यादा दिली जाते की, विशिष्ट मर्यादेपलिकडे उत्त्पन्न असेल तर ओबीसी आरक्षण दिलं जात नाही. त्याचप्रमाणे, कर्जमाफीसाठीही निकष ठरवले जातील.
संबंधित बातमी : सरसकट कर्जमाफी तत्वतः मान्य, शेतकरी आंदोलनाला ऐतिहासिक यश