Kolhapur North Bypoll : उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणूक ही महाविकास आघाडीसोबतच भाजपसाठीही महत्त्वाची आणि चुरशीची बनली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री  सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याचवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांच्या कसबा बावड्यातील घरासमोर असलेल्या मतदान केंद्रवर ठाण मांडलं. एवढंच नाही चंद्रकांत पाटील यांनी आज चक्क मतदान केंद्राबाहेर बूथवर मतदारांना स्लिप वाटपाचे काम केलं.


कसबा बावडा हा परिसर पालकमंत्री सतेज पाटील यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे कसबा बावडामधल्या एका मतदान केंद्रावर काही वेळ थांबून चंद्रकांत पाटील यांनी मतदारांना स्वतः स्लिपचं वाटप केलं. 'बावड्यामध्ये कोणाची दादागिरी चालू देणार नाही', असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला. तसंच 'हम किसी को टोकेंगे नहीं लेकिन हमें किसी ने टोका तो छोडेंगे नहीं, असंही म्हटलं.


महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या जयश्री पाटील या निवडणूक लढवत आहेत. तर भाजपकडून सत्यजित कदम निवडणुकीच्या रिंगणात आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रचार करण्यात आला असून, दोघांनीही विजयाचे दावे केले आहेत.


कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसकडून सतेज पाटील यांनी शड्डू ठोकला असून कोणत्याही परिस्थितीत ही जागा कायम राखायची असा पण घेतला आहे. तर भाजपकडून चंद्रकांत पाटील गेल्या कित्येक दिवसांपासून कोल्हापुरात ठाण मांडून आहेत. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही कोल्हापुरात येऊन प्रचार केल्याने निवडणुकीची रंगत आणखीच वाढली आहे. त्यामुळे आता चंद्रकांत पाटील यांनी स्वतः घराबाहेर पडत मतदान केंद्रावर मतदानाच्या परिस्थितीचा आढावा घेतला.


मतदान केंद्रावर चंद्रकांत पाटील आणि ऋतुराज पाटील यांची भेट
दरम्यान बावड्यातील याच मतदान केंद्रावर चंद्रकांत पाटील आणि काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांची भेट झाली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी ऋतुराज यांच्याकडून सतेज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या. आमदार ऋतुराज पाटील हे सतेज पाटील यांचे पुतणे आहेत. सतेज पाटील यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची पन्नाशी पूर्ण केली आहे. 


संबंधित बातम्या