Kolhapur Election 2022 : कोल्हापूर (Kolhapur) उत्तर मतदार संघातल्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू झालं आहे. मात्र तरीही इथलं राजकराण थांबण्याचं नाव घेत नाही. महाविकास आघाडीनं भाजपवर पैसे वाटप करत असल्यचा आरोप केल्यानंतर आता भाजपनंही काँग्रेस कार्यकर्ते पैसे वाटत असल्यचा आरोप केला आहे. कोल्हापूरच्या शाहुपुरी भागांत काल रात्री उशीरा पैसे वाटणाऱ्यांना माजी महापौपर सुनील कदम यांनी पकडलं होतं. हे कार्यकर्ते सतेज पाटील यांचे असल्याचा सुनील कदम यांचा आरोप आहे. आता तिकडे भाजपच्या माजी नगरसेविकेच्या कार्यालयातही पैशाची पाकिटं सापडली आहेत. मतदारांना पैसे वाटत असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान करण्यात येत आहे. मात्र मतदानाच्या पूर्वसंध्येला मतदारांना प्रलोभनं दिल्याचा आरोप केला जात आहे. काल (सोमवारी) भाजपच्या माजी नगरसेविकेच्या कार्यालयात पैशाची पाकिटं सापडली. मतदारांना पैसे वाटत असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. या कार्यकर्त्यांकडे मतदार यादी आणि पैशांची पाकिटं सापडल्याची माहिती मिळतं आहे. भाजपच्या माजी नगरसेविका सुनंदा मोहिते यांच्या कार्यालयावर पोलिसांनी ही कारवाई केली होती. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु असून अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. अशातच आता भाजपनंही काँग्रेस कार्यकर्ते पैसे वाटत असल्यचा आरोप केला आहे. त्यामुळे कोल्हापूर निवडणुकीच्या मतदानापूर्वीच भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा वाद रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेसाठी एकूण 2 हजार 142 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, एकूण 357 केंद्रांवर ही मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदानाच्या प्रक्रियेसाठी 357 ईव्हीएम मशीन (EVM Machine) ठेवण्यात आलेत. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात एकूण 7 संवेदनशील मतदान केंद्रं आहेत. एकूण 550 पोलीस कर्मचाऱ्यांचा फोजफाटा तिथे तैनात करण्यात आला आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीत 80 वर्षांच्या आणि दिव्यांग नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच मत नोंदवण्यात आलं होतं. तसाच प्रयोग आता या निवडणुकीत केला जाणार आहे.
महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) काँग्रेसच्या जयश्री पाटील या निवडणूक लढवत आहेत. तर भाजपकडून सत्यजित कदम निवडणुकीच्या रिंगणात आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रचार करण्यात आला असून, दोघांनीही विजयाचे दावे केले आहेत.