कोल्हापूर : 'जनाधार नसल्याने भाजपने पैसे वाटले, पण जनता योग्य उत्तर देईल,' अशी प्रतिक्रिया कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सतेज पाटील यांनी कसबा बावडा इथल्या राजर्षि शाहू विद्यामंदिर इथे मतदान केलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सतेज पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
मतदारांना पैसे वाटत असल्याच्या संशयावरुन भाजपच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी बोलताना सतेज पाटील म्हणाले की, "भाजप पैसे घेऊन मतं घेते हे स्पष्ट झालं आहे. भाजप कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. जनाधार नसल्याने भाजपने पैसे वाटले. चंद्रकांत पाटील आता सारवासारव करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसकडून कोणत्याही ठिकाणी पैशांचं वाटप करण्यात आलेलं नाही."
"प्रचंड उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे. भाजपने पैसे वाटून मतं विकत घेण्याचा प्रयत्न केला, हा प्रयत्न जनता हाणून पाडेल. सिलेंडरचे दर वाढले, सर्वसामन्यांचं कंबरडं मोडलं आहे, त्याचं योग्य उत्तर जनता देईल, असंही सतेज पाटील म्हणाले.
पराभव दिसू लागल्याने भाजप कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे : चंद्रकांत पाटील
दरम्यान पोटनिवडणुकीच्या मतदानाआधी भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते म्हणाले की, "पराभव दिसू लागल्याने भाजप कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र मतदारांवर याचा काही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकल्याने असे कृत्य केलं जात आहे. कार्यकर्त्यांच्या घरात घुसून झाडाझडती घेतली जात आहे. परंतु अशा कारवाईला आम्ही घाबरणार नाही."
यावर पोलिसांच्या कामावर शंका घेत आहात का? असा सवाल सतेज पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना विचारला. तसंच चंद्रकांत पाटील सारवासारव करण्याचा प्रयत्न करत आहेत. दादांनी या कार्यकर्त्यांवर ईडी लावावी, असा टोलाही पाटील यांनी लगावला.
संबंधित बातम्या