मुंबई : पुढील वर्षी 19 मार्च रोजी साहेबराव करपे यांच्या गावी सामूहिक श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. त्यासाठी किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी 'चलो चिल गव्हाण' हा नारा दिला आहे. 19 मार्च 1986 रोजी साहेबराव करपे यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली होती. ही महाराष्ट्राला हादरावणारी आणि जाहीर असलेली शेतकऱ्याची पहिली सामूहिक आत्महत्या मानली जाते. या निमित्ताने शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली जाते. सोबतच अनेक जण एक दिवसाचा वैयक्तिक उपवासही करतात.
दरवर्षी एका ठिकाणी 19 मार्च रोजी साहेबराव करपे यांच्यासह आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विशेष कार्यक्रम केला जातो. यंदा साहेबराव करपे यांच्या गावी (चिल गव्हाण, ता. महागाव, जि यवतमाळ) इथे जमून श्रद्धांजली वाहावी, असा निर्णय किसानपुत्रांनी केला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला राहिल. ज्याला सहवेदना व्यक्त करायची आहे, असा कोणीही व्यक्ती त्यात सामील होऊ शकतो, असं किसानपुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांनी सांगितलं.
19 मार्च 2021 रोजी चिल गव्हाण इथे सकाळपासून लोक जमणार आहेत. तिथे दिवसभर विविध कार्यक्रम चालतील. दुपारी तीन वाजता सभा होईल. सामूहिक श्रद्धांजली अर्पण करुन कार्यक्रमाची सांगता केली जाईल, अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब व अनंत देशपांडे यांनी दिली आहे. संतोष अरसोड, लक्ष्मण बोर्कुट, मनिष जाधव, अॅड सुभाष खंडागळे, डॉ आशिष लोहे, चंद्रकांत जटाले, मयुर बागुल, नितीन राठोड, सुभाष कच्छवे, राम किसन रुद्राक्ष, राजीव बसरगेकर, राजेश वाघमोडे यांनी 'चलो चिल गव्हाण' मोहिमेचे स्वागत केलं आहे.