रत्नागिरी : पेट्रोल-डिझेलवरील एक्साईज दरवाढीमुळे वाहनचालकांच्या खिशाला फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र याचा इंधनदरावर फारसा परिणाम जाणवणार नाही, अशी प्रतिक्रिया फामपेडा (फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशन)चे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलवरील एक्साईज दरामध्ये प्रत्येकी एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र पेट्रोल-डिझेल दराबाबत ग्राहकांच्या खिशाला फार फरक पडणार नाही, असं फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांचं म्हणणं आहे.

एक्साईज कर वाढल्याने महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलमध्ये प्रति लिटर सव्वा रुपयांनी वाढणं अपेक्षित आहे आहे. मात्र गेल्या महिनाभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी झाल्या आहेत. पेट्रोल सव्वा रुपयांनी तर डिझेल सव्वादोन रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे एकूण दरवाढीचा ग्राहकांच्या खिशावर फार मोठा फरक पडेल, असं वाटत नसल्याची प्रतिक्रिया उदय लोध यांनी दिली आहे.

मोदी सरकारने बजेटमध्ये सोनं तसंच सिगरेट, गुटखा आणि बिडीवरील कराची टक्केवारी वाढवली. मध्यमवर्गासाठी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर श्रीमंतावरील कर्जाचा बोजा वाढवला आहे. याशिवाय गावा-खेड्यात पाणी, वीज, शौचालय आणि गॅस कनेक्शन देण्यावर भर दिला.

अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त, काय महाग?

महाग-

  • पेट्रोल, डिझेल

  • सोनं

  • एसी

  • सीसीटीव्ही कॅमेरा

  • लाऊड स्पीकर

  • काजू

  • साबणासाठी वापरली जाणारी तेलं

  • प्लास्टिक

  • रबर

  • इम्पोर्टेड फर्निचर

  • पुस्तकं, वृत्तपत्रांचा कागद

  • टाईल्स

  • वाहनांच्या चेसिज


स्वस्त

  • मोबाईल फोनचे चार्जर

  • मोबाईल फोनच्या बॅटरी

  • सेट टॉप बॉक्स