मुंबई : राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर बनली आहे. उजाड माळरान, ओसाड जमीन, प्यायला आणि पिकाला पाणी नाही, जनावरांना चारा नाही अशा परिस्थिती शेतकऱ्यांना सरकारी मदतीची आस आहे. केंद्राचं 10 सदस्यीय पथक दुष्काळ पाहणीसाठी राज्यात दाखल झालं आहे. या पथकानं विदर्भ, मराठवाडा आणि पुणे विभागात दुष्काळाचा धावत्या पाहणीला सुरुवात केली आहे. धावता पाहणी दौरा यासाठी कारण हे पथक येतं आणि काही क्षणात निघूनही जातं, असंच काहीस चित्र आहे.


सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील आंधळगावात रस्त्यावरील धुराळा उडवत केंद्राचं पथक पोहोचलं. रोडच्या कडेला असलेल्या सिताराम वेळापुरे यांच्या शेतात उभ्या उभ्या दोन मिनिटाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला . आपली तळमळ कळावी म्हणून दिल्लीच्या साहेबांशी मोडक्या तोडक्या हिंदी भाषेतून बोलूण शेतकरी दुष्काळाची दाहकता सांगण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी आपलं गाऱ्हाण मांडण्यासाठी आलेल्या 85 वर्षीय अपंग आजोबांकडे मात्र पथकानं साफ दुर्लक्षच केलं.


परभणी
परभणी जिल्ह्यातील गणेशपूर परिसरात पथकानं कापसाच्या पिकाची पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी दुष्काळी उपाययोजनांबाबत विचारलेल्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी, कृषी अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. शेतकऱ्यांना सॉईल हेल्थ कार्ड, मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड देऊ शकत नाही, तर काय दिलासा देणार असा जाब पथकानं अधिकाऱ्यांना विचारला. दरम्यान, पथकानं पेडगावचा नियोजित दौरा रद्द केल्यानं शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला. आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांमुळे पथकाला आपल्या गाड्या पेडगावला वळवणं भाग पडलं.


जळगाव
जामनेर तालुक्यात केंद्रीय पाहणी पथकानं चक्क संध्याकाळच्या अंधारात बॅटरी लावून परिस्थितीची पाहणी केली. आता बॅटरीच्या उजेडात त्यांना किती दुष्काळ दिसला हा प्रश्नच आहे. पण, पथकानं पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं मान्य केलं. त्यामुळे आता केंद्राकडून किती मदत मिळते याकडं शेतकरी आस लावून बसला आहे.


जालना
जालना जिल्ह्यात सकाळी 11 वाजता नियोजित पाहणी दौरा होता. मात्र तो सुरु व्हायला दुपारचा एक वाजला होता. बदनापूर तालुक्यातील पाहणी करताना पथकानं दोन गावांना भेटी दिल्या. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा पथकासमोर मांडल्या.


सांगली
दुष्काळी पाहणीसाठी आलेल्या केंद्राच्या पथकानं आटपाडी तालुक्यातील गावांमध्ये पाहणी केली. या पथकासोबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी आपलं गाऱ्हाणं पथकासमोर मांडलं. या पाहणीनंतर सरकार काही मदत आणि जनावरांच्या चाऱ्याची सोय करेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पाहाणी करणं केंद्रीय पथकाला अशक्य आहे, मात्र अधिकाऱ्यांच्या रिपोर्टमध्ये दुष्काळाचं वास्तव मांडलं जावं एवढीच अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. इतकीच अपेक्षा आहे.


राज्यात 26 जिल्ह्यांमधल्या 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर


राज्यातील 26 जिल्ह्यांमधल्या 151 तालुक्यांमध्ये राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. 112 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा, तर 39 तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे.


राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरला, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करुन या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यांमध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेऊन राज्य शासन परिशिष्ट 'अ' मध्ये नमूद केलेल्या 151 तालुक्यांमध्ये त्यांच्या नावासमोर दर्शवल्याप्रमाणे गंभीर/मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.