सातारा : पुण्याहून महाबळेश्वरला फिरण्यासाठी गेलेल्या एका पती-पत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले. या भांडणामुळे रागावलेल्या पतीने 11 वर्षांच्या मुलादेखतच पत्नीचा गळा कापला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पत्नीला मारल्यानंतर स्वतःचाही गळा कापून आत्महत्या केली आहे.

अनिल शिंदे आणि सीमा शिंदे असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. पुण्याच्या धानोरी येथील विश्रांतवाडीत राहणारे शिंदे दाम्पत्य 5 डिसेंबर रोजी महाबळेश्वमध्ये फिरण्यासाठी आले होते. बुधवारी ते एका हॉटेलमध्ये थांबले. रात्री दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले. हे भांडण इतक्या टोकाला पोहोचले की, अनिल शिंदे याने त्याच्याजवळ असणाऱ्या चाकूने सीमाचा गळा कापला. त्यानंतर त्याने स्वतःचादेखील गळा कापून आत्महत्या केली.

हा सर्व प्रकार शिंदे दाम्पत्याच्या 11 वर्षांचा मुलासमोर घडला आहे. त्यानंतर बिथरलेल्या मुलाने याबाबतची माहिती हॉटेल मालकाला दिली. हॉटेल मालकाने ताबडतोब पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. पोलीस सध्या घटनेचा तपास करत आहेत.