मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध सीबीआयने चौकशी सुरु केली आहे. सीबीआयची टीम आजपासून तपासाला सुरूवात करणार आहे. सर्वात आधी सीबीआय परमबीर सिंह यांचा जबाब घेणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर मुंबई पोलीसचे उपायुक्त राजू भुजबळ आणि त्यांच्या सोबतच एसीपी पाटील यांनाही चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे. यांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक पालंडे यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.
यासोबत सीबीआयची टीम याप्रकरणी पुरावे गोळा करण्याचे काम करेल आणि जर प्रथमदर्शनी तपासामध्ये पुरावे समोर आले तर या प्रकरणात गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
सीबीआय सूत्रांच म्हणणं आहे की अनिल देशमुख यांची चौकशी होणार आहे. ही चौकशी गुन्हा दाखल झाल्यानंतर होईल का आधी हे तपासाची दिशा पाहता निर्णय घेतला जाईल. आज सीबीआयची चार इन्सपेक्टर रँकचे अधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत तर पुढच्या एक ते दोन दिवसांमध्ये एसपी रँकचे अधिकारी देखील मुंबईत दाखल होतील. पुढच्या 15 दिवसांत तपासाचा अहवाल हायकोर्टात साजर केला जाईल आणि त्यानंतर सीबीआय तपासासाठी आणखी वेळ मागण्याचा प्रयत्न करणार आहे.
अनिल देशमुख यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा
अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर तात्काळ अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. अनिल देशमुख यांनी ट्वीट करत म्हटलं की, "उच्च न्यायालयाकडे अॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केले आहेत. त्यामुळे मी गृहमंत्री पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत:हून पदापासून दूर होत आहे."
महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी तातडीने दिल्ली गाठली. दिल्लीत ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत रात्री नऊ ते दहा अशी जवळपास तासभर खलबतं केली. यावेळी राज्य सरकारचे सुप्रीम कोर्टातले वकील राहुल चिटणीस आणि इतर जवळपास पाच ते सहा वकिलांची फौजही सिंघवी यांच्या 'अनीतायन' या निवासस्थानी हजर होती. हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर आता सुप्रीम कोर्टात याबाबत काय पाऊल उचलता येईल यावर या बैठकीत मंथन झालं आहे. बैठकीनंतर कुठलीही प्रतिक्रिया न देता अनिल देशमुख हे तिथून निघाले. त्यामुळे सुप्रीम कोर्टात त्यांचं पुढचं पाऊल आता काय असणार याची उत्सुकता आहे.