Kolhapur News : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार आणि कोल्हापुरातील शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर यांनी आपल्या वाढदिनी चांदीच्या तलवारीने केक कापला. हा प्रकार बेकायदेशीर असून हा दखलपात्र गुन्हा असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ठाकरे गटाचे शहरप्रमुख रविकरण इंगवले यांनी आहे. याबाबत तक्रार अर्ज लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. तलवारीने केक कापण्याचा हा प्रकार हा सार्वजनिक ठिकाणी झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 24 नोव्हेंबर रोजी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा करत असताना त्यांनी चांदीच्या तलवारीने केक कापला.


भारतीय हत्यार अधिनियम कायदा कलम 4 आणि 25 प्रमाणे हा प्रकार बेकायदेशीर असून तो दखलपात्र गुन्हा आहे. कायद्यानुसार क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल करावा. पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता हा गुन्हा दाखल करावा, अन्यथा आम्ही न्यायालय स्तरावर दाद मागू  इशारा रविकिरण इंगवले यांनी दिला. यापूर्वी पोलिसांनी अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आणि तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांवर तलवारीने केक कापल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे क्षीरसागर यांच्यावरही गुन्हा नोंद करावा, अशी मागणी इंगवले यांनी केली आहे.


दरम्यान, रविकिरण इंगवले यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर राजेश क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ते म्हणाले, बिनपरवाने हत्यार वापरून आम्ही खून, मारामारी केलेली नाही. मी आजवर अनेकांचे प्राण वाचवले आहेत. सर्वसामान्यांना वैद्यकीय मदत दिली आहे, पण चांदीची तलवार माझ्या संग्रही असून त्या तलवारीने केक कापला आहे. 


खून, मारामाऱ्या, विनयभंग प्रकरणातील अट्टल 'भास्कर' प्रकटला! 


दरम्यान, तलवारीचा वाद सुरु झाला असतानाच राजेश क्षीरसागर यांना वाढदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खून, मारामारी, खंडणी, अपहरण, विनयभंग, सावकारी प्रकरणतील अट्टल सराईत गुंड अमोल भास्कर मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर झळकल्याने संतापाचा कडेलोट झाला. राजेश क्षीरसागर यांना 24 नोव्हेंबरला वाढदिनी शुभेच्छा देण्यासाठी शहरात फलक लावण्यात आले होते. या फलकावर अट्टल भास्कर प्रकट झाल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या. 


माध्यमांमध्ये याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत फलक उतरवले होते. मात्र, त्याने महापालिकेची  परवानगी घेत बॅनर लावल्याचे समोर आले होते. त्यानंतर पुन्हा फलक लावण्यात आल्याची चर्चा रंगली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या