Radhakrishna Vikhe Patil : राष्ट्रवादी काँग्रेसची शेतकरी दिंडी आणि उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा हा केवळ राजकीय फार्स असल्याचे वक्तव्य महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले. अडीच वर्षे सत्तेत असताना यांना जनतेची आठवण झाली नाही. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांची आठवण झाली नाही. केवळ सत्ता गेल्यामुळेच यांना शेतकरी दिंडी आणि विदर्भ दौरा काढावा लागतोय, अशा शब्दात विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.


महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर संविधान दिन साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन संविधानाच्या उद्देशीकेचे वाचन करण्यात आले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य करताना महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली. 


टीका करणाऱ्यांनी आपापल्या श्रद्धास्थानी जावं आणि अभिषेक करावा


कामाख्या देवी हे लोकांच श्रद्धास्थान आहे. श्रद्धास्थानी जाणं आणि दर्शन घेणं यात काही वावगं नाही. ज्या लोकांना जनतेनं नाकारलं त्यांच्याकडून यावर टीका होणार हे सहाजिकच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. टीका करणाऱ्यांनी देखील आपली श्रद्धास्थान जिथे आहेत तिथे जावून अभिषेक करावा असा खोचक टोला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांना लगावला.


संजय राऊत यांना दिलेले स्क्रिप्ट सिल्वर ओकमधून


स्क्रिप्ट लिहिणं आणि लिहून दिलेल्या स्क्रिप्टचे वाचन करणं याचा संजय राऊत यांना मोठा अनुभव आहे. महाविकास आघाडी सरकार असताना संजय राऊत यांना दिलेले स्क्रिप्ट सिल्वर ओकमधूनच दिले जात होतं. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांची वक्तव्य ही भाजपची ठरलेली स्क्रिप्ट असल्याचे संजय राऊत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा विखे पाटलांनी चांगलाच समाचार घेतला.


महाराष्ट्र-कर्नाटक सिमाभागाला राष्ट्रवादी जबाबदार


महाराष्ट्र-कर्नाटक सिमा भागात तीव्र लोकभावना असलेल्या गावांमध्ये लक्ष घालणार आहे. विशेष पॅकेज देऊन त्या ठिकाणच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. गेली अनेक वर्ष त्या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिलं आहे. त्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण होण्यास राष्ट्रवादी काँग्रेसच जबाबदार असल्याचे म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाण साधला आहे.


19 डिसेंबरपासून नागपुरात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भात शेतकरी दिंडी काढण्याचे ठरवले. त्याचा मार्ग व तारीख पुढच्या आठवड्यात निश्चित ठरणार आहे. तर दुसरीकडे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुलढाण्यात जाहीर सभा होणार आहे. यावरुन विखे पाटलांनी जोरदार टीका केली.


महत्वाच्या बातम्या:


पंढरपूर विकास आराखड्यामुळे नागरिक, व्यापाऱ्यांना विस्थापित होण्याची भीती; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची आज प्रशासनासोबत बैठक