Maharashtra and Karnataka Border Dispute : महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेवर बंदी घाला, अशी मागणी सीमाभागात हैदोस घालणाऱ्या रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र फाडून रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. कर्नाटकच्या बसवर हल्ला केल्यास महाराष्ट्राचे एकही वाहन कर्नाटकात येऊ दिले जाणार नाही. कर्नाटक सरकार हातात बांगड्या घालून बसले नाही. निष्कारण जनतेला त्रास देण्याचा प्रयत्न कराल, तर आमच्याशी गाठ आहे अशी दर्पोक्ती कन्नड रक्षण वेदीकेच्या म्होरक्याने बेळगावात दिली. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र जमून घोषणाबाजी करून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. बंगळूरमधून पुढील आठवड्यात हजारो कार्यकर्ते बेळगावला येणार आहेत. बेळगावातील आणि अन्य भागातील कन्नड जनतेचे आम्ही रक्षण करण्यास कटिबध्द आहोत, असेही कन्नड संघटनेचा म्होरक्या म्हणाला.


अथणी-सांगली या कर्नाटकच्या बसवर सांगलीत दगडफेक


दरम्यान, कर्नाटकने महाराष्ट्रात बससेवा सुरू केल्यानंतर अथणी-सांगली या कर्नाटकच्या बसवर सांगली येथे दगडफेक करण्यात आली. महाराष्ट्रात कर्नाटकच्या बसला दौंडमध्ये काळे फासल्यानंतर कर्नाटकने महाराष्ट्रातील बससेवा शुक्रवारी दुपारनंतर स्थगित केली होती. तथापि, शनिवारी सकाळी 11 वाजता कर्नाटकने आपली महाराष्ट्रात बससेवा सुरू केली. केए-23-एफ-1004 क्रमांकाची अथणी डेपोची बस अथणी येथून पुण्याला निघाली होती. त्यावेळी सांगली येथे काहींनी बसवर दगडफेक करून बसच्या समोरील भागाची काच फोडली. कर्नाटकच्या बसवर दगडफेक करून बसची काच फोडल्यामुळे कर्नाटकची बससेवा पुन्हा बंद करण्यात येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे बससेवा सुरू झाल्याने नोकरी ,उद्योगासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकात दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.


सोलापूर डेपोच्या एसटी कर्नाटक हद्दीत अडवल्या


दरम्यान, कोल्हापूरमधून एसटीसेवा पूर्ववत झाली असली, तरी सोलापूर आगारातील महाराष्ट्राच्या बसेस कर्नाटक हद्दीत कर्नाटक पोलिसांनी या बसेस अडवल्याचे समोर आले आहे. सोलापूर-गुलबर्गा मार्गावरील हिरोळीजवळ तीन बसेस आणि दुधणीजवळील सिन्नूर सीमेजवळ दोन बसेस रोखल्याची माहिती आहे. कर्नाटकच्या बसवर काळे फासल्याने आणि घोषणा लिहिल्याने कर्नाटकातून महाराष्ट्रात बससेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. 


शिवसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांचा तिरडी मोर्चा 


दरम्यान, कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांनी बसवराज बोम्मई यांचा तीव्र निषेध करत शुक्रवारी तिरडी मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला असता शिवसैनिकांशी जोरदार झटापट झाली. ही अंत्ययात्रा कोल्हापुरातील दसरा चौक ते जयंती नाला असा काढण्यात येत होती. दरम्यान, हे आंदोलन काही अंतरावर जाताच पोलिसांनी तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. 


इतर महत्वाच्या बातम्या