Solapur News Update : लग्न जमण्यासाठी केलेल्या बनवाबनवीमुळे तरूणाला जेलमध्ये जावे लागले आहे. पंढरपूर तालुक्यातील आंबे गावातील हा नववी पास तरुण लग्नासाठी आपण पोलीस अधिकारी असल्याचे भासवत होता. नकली नाव , नकली वर्दी , नकली पिस्टल , नकली आधारकार्ड आणि थेट नकली पोलीस अधिकारी असलेले ओळखपत्र घेऊन हा भामटा मुलींना जाळ्यात ओढायचे काम करत होता. परंतु, एका तरूणीच्या सर्तकतेमुळे लग्नाच्या बेडीत अडकण्याऐवजी पोलिसांनी या तरूणाला बेड्या ठोकल्या आहेत. रमेश सुरेश भोसले असे या तोतयागिरी करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. पंढरपूर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 


संशयित आरोपी रमेश याने सोशल मीडियावर पोलीस ड्रेसमधील काही व्हिडीओ शेअर केले होते. पंढरपूर शहरातील एक तरुणी पोलीस बनण्यासाठी यमाई ट्रॅकवर धावण्याचा व्यायाम करत असताना या भामट्याने तिला हेरले. तिच्याशी ओळख काढण्यासाठी तिला धक्का दिला आणि नंतर सॉरी म्हणत आपण पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले. त्याने आपले नाव संग्राम भोसले असे सांगून तरूणीसोबत ओळख करून घेतली. मी तुला पोलीस करतो असे सांगत या भामट्याने आपले वडील आयपीएस अधिकारी असल्याचेही तिला सांगितले.


ओळख वाढवत त्याने थेट या मुलीच्या घरात देखील प्रवेश मिळवत कुटुंबाकडे या मुलीचा हात मागितला. हळूहळू मुलीला या भामट्याचा संशय येऊ लागला. त्यामुळे तिने त्याला कोणत्या पोलीस ठाण्यात नोकरीवर आहे? असे विचारताच त्याने आपण मंगळवेढा पोलीस ठाण्यात सब इन्स्पेक्टर आहे असे सांगितले. कुटुंबाचा या भामट्यावर विश्वास बसला असल्याचे मुलीच्या लक्षात येताच तिने दुचाकीवरून थेट मंगळवेढा पोलीस ठाणे गाठले. तेथे संग्राम भोसले नावाचा कोणी पोलीस अधिकारी आहे का? याची चौकशी केली असता, असा कोणी अधिकारी नसल्याचे तिला समजले. यानंतर तिचा संशय वाढल्याने या तरुणीने थेट पंढरपूर दामिनी पथकातील अधिकारी प्रशांत भागवत यांच्याशी संपर्क साधला.


हे प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी ट्रॅप लावत या भामट्याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता यापूर्वी देखील त्याने पोलीस अधिकारी असल्याचे भासवत एका मुलीला फसवल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी या नकली पोलीस अधिकाऱ्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने आपले कारनामे सांगितले. 


पोलिसांची वर्दी सोलापूर येथून खरेदी केली असे सांगत नकली आधारकार्ड आणि पोलीस ओळखपत्र झेरॉक्स दुकानातून बनवून घेतल्याची कबुली दिली. पोलीस अधिकारी आहे असे सांगितल्यानंतर मुली भुलतात म्हणून हे नाटक केल्याची कबुली या भामट्याने पोलिसांकडे दिली. त्यानंतर त्याच्यावर फसवणुकीसह इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आज त्याला पंढरपूर न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


तरुण मुलींनी अशा कोणत्याही खोट्या प्रलोभनांना न भुलत कोणी त्रास देत असेल तर तातडीने पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले आहे. फक्त लग्न करण्यासाठी पोलीस अधिकारी असल्याचे भासवत मुलीची फसवणूक करणे या भामट्याला चांगलेच महागात पडले असून लग्नाच्या बेडी ऐवजी पोलिसांच्या बेडीत अडकावे लागले आहे.


महत्वाच्या बातम्या