सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्यातील संघर्ष वाढल्याचं चित्र आहे. उदयनराजेंवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यातील लोणंद शहराजवळ सोना अलाईज नावाची कंपनी आहे. या कंपनीत उदयनराजे यांच्या नेतृत्वात काम करणारी एक माथाडी कामगार संघटना आहे, तर दुसऱ्या संघटनेचं नेतृत्व रामराजे निंबाळकर करतात.

कंपनी रामराजेंच्या संघटनेला झुकतं माप देते, त्यांना अधिक काम देते, असा उदयनराजेंचा आरोप होता. त्यामुळे 18 फेब्रुवारीला त्यांनी कंपनीचे अधिकारी राजकुमार जैन यांना सातारा विश्रामगृहात बोलावून घतलं.

उदयनराजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजकुमार जैन यांना तिथे मारहाण केली आणि काही ऐवज काढून घेतला, अशी तक्रार जैन यांनी सातारा पोलीस स्टेशनला दिल्यानंतर उदयनराजे आणि त्यांच्या साथीदारांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक सावंत, रणजीत माने, सुकुमार रासकर, धनाजी धायगुडे, राजकुमार गायकवाड, अविनाश सोनवले, ज्ञानेश्वर कांबळे आणि योगेश बांदल अशा 9 जणांना अटक करण्यात आली आहे.