संगमनेर (अहमदनगर) : संगमनेरमधील नववीच्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला पोलिस संरक्षणात परीक्षा द्यावी लागणार आहे. 1 एप्रिलपासून या विद्यार्थिनीची परीक्षा सुरु होत आहे.  गावातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून मुलीला त्रास होत असल्याने औरंगाबाद न्यायालयाने संरक्षण पुरवण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत.


प्रकरण काय आहे?

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित मुलीला गावातीलच गुंड प्रवृत्तीच्या मुलांकडून त्रास होत होता. सततच्या या त्रासाला कंटाळून नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्याआधारे 2013 लाच आरोपींविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी चार पैकी एका आरोपीने औरंगाबाद खंडपीठात अपिल दाखल केले आहे.

या सुनावणी दरम्यान पीडित कुटुंबाला आपली बाजू मांडण्यासाठी कोर्टात बोलावले असता, पीडित कुटुंबियांनी पीडितेच्या मोठ्या बहिणीलाही असाच त्रास देण्यात येत होता. त्यानंतर पीडित मुलीलाही असाच त्रास झाला असल्याची तक्रार न्यायालयासमोर मांडली.

आम्ही मोलमजुरी करून आमचं कुटुंब चालवतो. मात्र, आजही आम्हाला या लोकांकडून त्रास होत असून, आमचं जगणं मुश्कील झालं असल्याचं पीडित मुलीच्या आईने सांगताना, सरकारने आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली.

न्यायालयाकडून पीडित मुलीला परीक्षेच्या कालावधीत संरक्षण पुरवण्याचे आदेश मिळाले असून, 1 एप्रिलपासून मुलीची परीक्षा सुरू होणार आहे. यासाठी आम्ही पोलीस संरक्षण देणार असल्याची माहिती संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गांगुर्डे यांनी दिली. तसेच, पोलीस संरक्षण खर्चापोटी पीडितेने कुठलीही रक्कम जमा न करण्याचेही निकालात स्पष्ट करण्यात आले आहे.