वाढदिवसाच्या अवघ्या एक दिवस आधी मुलगा गेला
दिपक साठे यांच्या 83 वर्षांच्या आईच्या वाढदिवसाच्या अवघ्या एक दिवसाआधी प्रवाशांचे जीव वाचवताना दिपक यांचा मृत्यू झाला. 83 वर्षांची आई तिच्या मुलाने वैमानिक म्हणून त्याचे कर्तव्य चोख बजावले आणि प्रवाशांचे प्राण वाचवले याचं मला समाधान असल्याची प्रतिक्रिया देत आहे. धीरोदात्त आईने आज त्यांच्या वैमानिक पुत्राच्या मृत्यूचा शोक न करता त्याच्या कामगिरीचा गर्व असल्याची प्रतिक्रिया देत एक वेगळाच उदाहरण जगासमोर ठेवला आहे.
दीपक साठे यांचे वृद्ध आई वडील सध्या नागपुरात त्यांच्या नातेवाईकांकडे राहतात. एबीपी माझासोबत बोलताना या धीरोदात्त आई वडिलांनी पुत्र गमावल्याचा दुःख व्यक्त करतानाच त्यांच्या पुत्राने समयसूचकता दाखवत 170 प्रवाशांचे प्राण वाचवले याचं समाधान असल्याची भावना व्यक्त केली. दीपक साठे हे विद्यार्थी दशेपासून खूप हुशार होते. शैक्षणिक आयुष्यानंतर एनडीए मध्ये प्रशिक्षण घेताना, त्यानंतर भारतीय हवाई दलात सेवा देताना त्यांनी अनेक पुरस्कार आणि मेडल्स मिळवल्याची माहिती दीपक साठे यांच्या आई नीला साठे आणि वडील रिटायर्ड कर्नल वसंत साठे यांनी दिली.
मुलाने संकटाच्या काळात ही दाखवलेली हिम्मत आणि समयसूचकता एवढ्या प्रवाश्यांचे प्राण वाचवण्यासाठी मोलाची ठरली याचे सार्थ अभिमान असल्याची भावना नीला साठे यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली. दीपक साठे यांचे वडील भारतीय सैन्यातून कर्नल या मानाच्या पदातून सेवानिवृत्त झाले असून आज मुलाच्या मृत्यूनंतर ते निशब्द झाले आहे. मुलाचा मला सार्थ अभिमान आहे एवढीच प्रतिक्रिया 87 वर्षीय कर्नल वसंत साठे यांनी दिली.
आधीही झाला होता एक अपघात, भावाची भावनिक फेसबुक पोस्ट
दीपक साठे यांचे भाऊ निलेश साठे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहित, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तो आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, दीपक हा 36 वर्षांचा अनुभव असलेला एक अनुभवी एअर ऑपरेटर होता. एनडीएचा पासआऊट असलेला दीपक 58 कोर्समध्ये अव्वल आणि 'स्वार्ड ऑफ ऑनर'चा पुरस्कारप्राप्त कॅप्टन होता. त्याने मला आठवडाभरापूर्वी फोन केला होता. तो नेहमीप्रमाणेच आनंदात होता. जेव्हा मी त्यांना 'वंदे भारत' अभियानाबद्दल विचारले तेव्हा त्यांना अरब देशांतील आपल्या देशवासीयांना परत आणल्याचा अभिमान वाटल्याचे सांगितले होते.
निलेश यांनी म्हटलं आहे की, एअरफोर्समध्ये असताना नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात हवाई दुर्घटनेत तो बचावला. दुखापतीमुळे त्याला सहा महिने रुग्णालयात दाखल केले गेले होते आणि पुन्हा ते उडाण घेतील असं कोणालाही वाटत नव्हतं . पण त्याच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि मित्रांच्या प्रेमामुळे पुन्हा तो मैदानात उतरला. हा एक चमत्कार होता, असं त्यांनी म्हटलंय.
Kerala Plane Crash | कॅप्टन दिपक साठेंनी गमावला जीव, महाराष्ट्राच्या सुपुत्राने जीवाची बाजी लावत वाचवले अनेक प्राण
एक कुशल लढाऊ पायलट असा त्यांचा लौकिक
या अपघात झालेल्या विमानाचे पायलट कॅप्टन दिपक वसंत साठे आणि कॅप्टन अखिलेश कुमार हे दोघे होते. कॅप्टन दिपक साठे हे फायटर पायलट होते. ते राष्ट्रीय सुरक्षा अकादमी (NDA) चे माजी विद्यार्थी होते. त्यांना अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनीही गौरवण्यात आले होते. एअर फोर्समधले एक कुशल लढाऊ पायलट असा त्यांचा लौकिक होता. वायु सेना अकादमीकडून स्वॉर्ड ऑफ ऑनर प्राप्त कॅप्टन दिपक साठे यांनी मिग विमानं सर्वाधिक वेळा चालवली होती. या दोन्ही पायलट कॅप्टननी आपला जीव गमावत जवळपास 170 लोकांचा जीव वाचवला.
दोन पायलटसह 18 जणांचा मृत्यू
केरळच्या कोझीकोडमध्ये एअर इंडियाचं एक विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत विमानाच्या दोन पायलटसह 18 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत 123 प्रवासी जखमी झाले आहेत तर 15 प्रवासी गंभीर जखमी आहेत. या अपघातात आपला जीव गमावून कित्येक जीव वाचवणारे कॅप्टन दिपक साठे हे महाराष्ट्राचे सुपुत्र होते. कॅप्टन दिपक वसंत साठे हे एअर फोर्सचे टेस्ट पायलट होते. एअर फोर्सचे टेस्ट पायलट अनेक एयरक्राफ्टवर टेस्ट करत असतात.
केरळमध्ये एअर इंडियांचं विमान लँडिंगदरम्यान दुर्घटनाग्रस्त, 18 जणांचा मृत्यू
सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीजचे संचालक एअर वायस मार्शल मनमोहन बहादुर यांनी साठे यांच्याविषयी ट्वीट केलं आहे. ते म्हणतात, दिपक साठे माझ्यासोबत टेस्ट पायलट म्हणून होते. ते अनुभवी पायलट होते. "RIP Tester".