मुंबई : दादा कोंडके हे नाव माहीत नाही असं कुणी नसेल. जुन्या पीढीचे नायक ते आजच्या पीढीलाही आपलं वाटणारं एक नाव. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दादा कोंडकेंची आज जयंती. कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके यांचा जन्म 8 ऑगस्ट 1932 रोजी नायगांव, मुंबईत झाला.


द्वि-अर्थी, विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली. नायगाव - मुंबईच्या मिलमजूर कामगाराच्या घरात गोकुळाष्टमीला जन्मलेल्या ह्या 'कृष्णा'ने नावाचे सार्थक मराठी चित्रपट सृष्टीच्या पडद्यावर दाखवून दिले. बॅंड पथकातून सुरुवात करून हळूहळू वगनाट्ये, नाटके ह्यांनी सुरुवात केलेल्या दादांचे चित्रपट जीवन मेहनतीने साकारले गेले.

पांढरपेशा वर्गाला त्यांच्या कमरेखालच्या विनोदांनी त्यांच्या सिनेमांपासून दूरच ठेवले. पण पिटातल्या प्रेक्षकांनी त्यांना जे डोक्यावर उचलून घेतले त्यानेच त्यांची कारकीर्द यशस्वी करवली. द्विअर्थी विनोदाकडे झुकणारे संवाद, चित्रपटातल्या तारिकेशी पडद्यावरची नको तितकी घसट व ह्या सर्वामुळे सतत सेन्सॉर बोर्डाशी उडणारे खटके, वादंग ह्यांनी त्यांच्या चित्रपटांना सतत निगेटिव्ह प्रसिद्धी मिळत राहिली. सोंगाड्या चित्रपटात त्यांनी नाम्याची भूमिका, पांडू हवालदार या त्यांच्या भूमिका तर अजरामर आहेत.

दादा कोंडकेंचे काही गाजलेले चित्रपट
तांबडी माती
सोंगाड्या
एकटा जीव सदाशिव
आंधळा मारतो डोळा
पांडू हवालदार
तुमचं आमचं जमलं
राम राम गंगाराम
बोटं लावीन तेथे गुदगुल्या
ह्योच नवरा पाहिजे
आली अंगावर
मुका घ्या मुका
पळवा पळवी
येऊ का घरात
सासरचे धोतर
गनिमी कावा

या हिंदी सिनेमांची निर्मिती
तेरे मेरे बीच में
अंधेरी रात में दिया तेरे हात में
खोल दे मेरी जुबान
आगे की सोच
चंदू जमादार

14 मार्च 1998 रोजी दादरच्या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना बाजूच्याच सुश्रूषा नर्सिंग होममध्ये दाखल केले. तिथंच त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

माहिती संदर्भस्त्रोत- विकीपीडिया