नवी दिल्ली : केरळच्या कोझीकोडमध्ये एअर इंडियाचं एक विमान कोसळलं आहे. या दुर्घटनेत विमानाच्या दोन पायलटसह 16 जणांचा मृत्यू झाला आहे. 123 प्रवासी जखमी झाले आहेत तर 15 प्रवासी गंभीर जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दुबईहून कालीकत येथे येणारं एअर इंडियांचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. रनवेहून घसरुन पुढे हे विमान निघून गेलं, त्यामुळे ही दुर्घटना झाली आहे. एअर इंडियाचं विमान IX-1344 हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. घटना घडल्यानंतर विमान दरीत कोसळलं आणि विमानाचे दोन तुकडे झाले आहेत.
फायर टेंडर आणि अॅम्बुलन्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. विमानाच्या पुढील भागाचं मोठं नुकसान झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी 7.45 च्या सुमारास ही घटना घडली. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, विमानात दोन पायलटसह सहा क्रू मेंबर्स होते. तर विमानात 191 प्रवाशी प्रवास करत होते, ज्यामध्ये 10 मुलांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. कोझिकोडमध्ये विमान अपघात झाल्याने मी दु:खी झालो आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावे. केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्याशी मी बोललो. अधिकारी घटनास्थळी आहेत, जखमींना सर्व मदत मिळत आहे.
Kerala Plane Crash | केरळच्या कोझीकोडमध्ये रनवेवरून घसरत विमान दरीत कोसळलं, विमानाचे दोन तुकडे