औरंगाबाद : अमानवी पद्धतीने एका ट्रकमध्ये तब्बल 14 उंटांना कोंबून घेऊन जात असताना पोलिसांनी ट्रक जप्त केला. औरंगाबाद पोलिसांनी उस्मानाबादजवळ ही कारवाई केली. या 14 उंटांपैकी चार उंटांचा मृत्यू झालाय. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानातून येऊन उंटांची तस्करी केली जाते आणि उंटांचं मांस आणि कातडीची तस्करांना मोठी किंमत मिळते.
अमानुष पद्धतीने तस्करी
औरंगाबादेतील बेगमपुरा भागातील गो शाळेत सध्या असलेल्या उंटांची अवस्था पाहून त्यांना काय मरण यातना सहन कराव्या लागत असतील याची कल्पना न केलेलीच बरी. तस्करांनी या उंटांचे पाय बांधले. ट्रकमधून नेताना आवाज करू नये म्हणून त्यांचं तोंडही बांधलं आणि या ट्रकमध्ये तब्बल 14 उंटांना कोंबून कोंबून भरलं. उंटांची अवस्था एवढी वाईट होती, की त्यांना ट्रकमधून बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा वापर करावा लागला.
राजस्थानातून हैदराबादकडे उंटाने भरलेला ट्रक पोलिसांनी अडवला आणि मरणासन्न अवस्थेत असलेल्या या उंटांची सुटका झाली. गेल्या दोन दिवसात चार उंटांनी जीव गमावला आहे, तर इतर काही उंट शेवटची घटका मोजत आहेत.
उंटांची एवढ्या अमानुष पद्धतीने वाहतूक केल्याप्रकरणी शहरातील सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांच्या मते, उंटांनी भरलेला आणखी एक ट्रक आहे, त्या ट्रकचा पोलीस शोध घेत आहेत. त्या बरोबरच ही उंट नेमकी हैदराबादला का नेली जात होती याचा देखील तपास सुरू आहे.
मांस आणि कातडीची भारतासह परदेशात विक्री
दरवर्षी राजस्थानातून देशात आणि परदेशात हजारो उंटांची तस्करी होते. 15 हजारात राजस्थानात मिळणाऱ्या उंटांची किंमत पुढे जाऊन लाखो रुपये होते.
उंटांचं मांस आणि कातडी महाग विकली जाते. खाडी देशात उंटांच्या मांसाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. राजस्थानमधील मालदा, सिलिगुडी, बागपत यूपी बॉर्डर, किशनगंज हे उंटांच्या तस्करीचे केंद्र आहेत. हैदराबाद, कर्नाटकसह इतर राज्यातून त्यांच्या कत्तली करून त्यांचं मांस आणि कातडी देशात आणि परदेशात पाठवली जाते.
राजस्थानच्या उंटांची तस्करी पूर्वी मध्यप्रदेश आणि बांगलादेशात व्हायची, मात्र आता या उंटांची तस्करी हैदराबाद आणि कर्नाटकसह इतर राज्यात होते. पोलीस दप्तरी नोंदीनुसार गतवर्षी 700 उंटांची तस्करी पोलिसांनी रोखली आहे.
उंटांची तस्करी रोखण्यासाठी राजस्थान सरकारने कायदा केला आणि तस्करी करताना पकडलं गेल्यास पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद केली. तरीही तस्करी थांबलेली नाही. पूर्वी मध्यप्रदेशपूर्ती मर्यादित असलेल्या उंटांची तस्करी आता इतर राज्यात आणि परदेशात देखील होत आहे. यामुळे दरवर्षी राजस्थानातून उंटांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. ही तस्करी अशीच सुरु राहिल्यास वाळवंटातून उंट नाहीसे होण्यासाठी वेळ लागणार नाही.
अमानुष पद्धतीने उंटांची तस्करी, मांस आणि कातडीची परदेशात विक्री
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
10 Sep 2018 06:47 PM (IST)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानातून येऊन उंटांची तस्करी केली जाते आणि उंटांचं मांस आणि कातडीची तस्करांना मोठी किंमत मिळते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -