बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथून जवळच असलेल्या शेलोडी इथल्या जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू. शंकरजी महाराज रविवारी सकाळपासून बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुयायांना मोठा धक्का बसला आहे. काही जणांच्या त्रासामुळे आपण निघून जात असून शोध घेण्याचा प्रयत्न करु नये, असं महाजारांनी एका पत्रात लिहून ठेवलं.


भक्तांच्या आयुष्यात प्रेरणास्त्रोत निर्माण करणारे प.पू. शंकरजी महाराज आश्रमातील काहींच्या त्रासामुळे व्यथित झाले होते. जागृती आश्रमाची जमीन, महाराजांनी स्थापन केलेली शिक्षण संस्था आणि व्यवहारावरुन काही जणांकडून त्यांना हेतूपुरस्सरपणे त्रास दिला जात होता. आश्रमाशी संबंधित पाच जणांनी सत्कार्याच्या मर्यादा ओलांडल्या. त्यामुळेच आपण खामगाव सोडत असल्याचं शंकर महाजारांनी चिठ्ठीत नमूद केलं आहे.


'जागृती'मधील वाद विकापोला जात असल्याचं निदर्शनास येताच, शंकर महाराजांनी गेल्या वर्षभरापूर्वीच सजनपुरी परिसरात 'तपोवन'ची निर्मिती केली. तेव्हापासूनच महाराज शेलोडी येथील आश्रमात जाण्याचे टाळत होते. परंतु, या वादावर तोडगा निघत नसल्याने व्यथित झालेल्या महाराजांनी रविवारी 'तपोवन' सोडले. आपला शोध न घेण्याची विनंतीही महाराजांनी चिठ्ठीत केली आहे.

यासंदर्भात जागृती आश्रमातील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी महाराज निघून गेल्याच्या वृत्ताला दुजारो दिला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस तक्रारीसंदर्भात 'तपोवन' इथे बैठक सुरु होती. अखेर महाराज बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे.

शंकर महाराज बेपत्ता झाल्याची पोस्ट सोशल मीडियावरही व्हायरल झाली असून, अनुयायांकडून महाराजांचा शोध घेण्यात येत आहे. काही भाविक रात्रीच 'तपोवन' इथे दाखल झाले असून, महाराज सुखरुप परत यावेत, यासाठी हनुमान चालिसा पठण आणि सामूहिक प्रार्थना केली जात आहे.

खामगाव आणि परिसरात या अध्यात्मिक गुरुंचा बराच मोठा भक्त परिवार आहे. महाराज अज्ञात स्थळी निघून गेल्याने भक्तांमध्ये खळबळ उडाली आहे. शिवाय महाराज मोबाईलचा वापर करत नसल्याने त्यांना शोधण्यास अडचणी येत आहेत.