सांगली : प्राथमिक शिक्षकांच्या राड्याची समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.


तसेच, वार्षिक सभेत शिक्षकांच्या वर्तनाबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी बोलणार असून, शिक्षकी पेशाला अशोभनीय प्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करा, असेही त्यांना सांगणार असल्याचे दिलीप कांबळे यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

सांगलीत काल (9 सप्टेंबर) झालेल्या प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत जोरदार राडा झाला. सभा सुरु असतानाच सत्ताधारी आणि विरोधक शिक्षकांमध्ये तुफान हाणामारी झाली. यावेळी शिक्षकांनी एकमेकांना अक्षरशः उरावर बसून बेदम मारहाण केली. यामुळे शिक्षक बँकेच्या सभेत एकच गोंधळ उडाला.

सभेत घेण्यात आलेले विषय, भ्रष्टाचार आणि अन्य  मुद्द्यांवर चर्चा सुरू असतानाच बँकेतील दोन गट स्टेजवर आले आणि त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. यावेळी सभागृहातील वातावरणही तापले आणि सभागृहातील खुर्च्याही फेकण्यात आल्या. या मारामारीवेळी कोणीतरी सभागृहातील लाईट घालवल्याने पुन्हा जोरदार राडा झाला. सभेत गोंधळ घालणाऱ्या विरोधात पोलिसात तक्रार देणार असल्याचे शिक्षक बँकेच्या अध्यक्षांनी सांगितले आहे. तर फेरसभा एकदा घेण्यात यावी, अशी मागणी विरोधी शिक्षक गटाने केली आहे.

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत असा राडा नेहमीच पाहायला मिळतो. पण यंदा या शिक्षक मंडळीनी जरा अतीच केलं. सभा सुरु होताच सत्ताधारी गटाचे संचालक शशिकांत बजबळे यांना व्यासपीठावर खाली पाडून मारहाण करण्यात आली. तर मारहाण करणाऱ्या गुरुजीला सत्ताधाऱ्यांनी प्रसाद दिला. या अभूतपूर्व गोंधळातच सत्ताधाऱ्यांनी सर्व विषय मंजूर करीत पाच मिनिटातच सभा गुंडाळली.

प्राथमिक शिक्षक बँकेची 66 वी सर्वसाधारण सभा दीनानाथ नाट्यगृहात पार पडली. सुरुवातीपासूनच सभेत तणावाची स्थिती होती. सत्ताधारी शिक्षक समितीने सभागृहात पहिल्या रांगेतील खुर्च्यांवर कब्जा केला होता. त्यात व्यासपीठासमोरील मोकळ्या जागेत जाण्यासाठीचा मार्गही खुर्च्या टाकून अडवला होता. यावरुन सभेच्या सुरुवातीलाच विरोधी शिक्षक संघ थोरात गटाच्या समर्थकांनी दंगा करण्यास सुरुवात केली.

बँकेचे व्यवस्थापक बाळासाहेब कोले यांनी अहवाल वाचनाला सुरुवात केली. विरोधी संचालक विनायक शिंदे यांनी व्यासपीठसमोर येत अजेंड्यावरील जागा व इमारत खरेदीचा विषय क्रमांक 9 रद्द करण्याची मागणी अध्यक्षांकडे केली. शिंदे समोर येताच सत्ताधारी गटाचे संचालकही त्यांच्या दिशेने धावले. याचवेळी खालून एक सभासद व्यासपीठावर धावून आला. तो संचालक बजबळे यांच्या अंगावर धावून गेला. दोघांत झटापट झाली. यात दोघेही खाली पडले. दोघांनीही एकमेकांना मारहाण केली. तोपर्यंत इतर संचालकही मदतीला धावले. त्यांनी बजबळे यांना बाजूला काढून त्या शिक्षकाला चोपले. या प्रकाराने सभागृहात अभूतपूर्व गोंधळ उडाला. बंदोबस्तांसाठी केवळ दोनच पोलीस सभागृहात असल्याने शिक्षकांच्या गोंधळ रोखण्यात तेही हतबल ठरले. मारहाण करणाऱ्या शिक्षकाला व्यासपीठावरून अक्षरश: ढकलत खाली काढण्यात आले. याच गोंधळात अध्यक्ष रमेश पाटील यांनी अजेंड्यावरील विषय वाचण्यास सुरुवात केली. अवघ्या दोन मिनिटात त्यांनी अजेंड्यावरील 13 विषय वाचले आणि सभा संपल्याचे जाहीर करून काढता पाय घेतला.

पाहा व्हिडीओ :