मुंबई: जुलैच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. कारण एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यामुळे अनेक महत्वाची पदं रिक्त आहेत. शिवाय अनेक मंत्र्यांच्या खांद्यावर अतिरिक्त जबाबदारी आहे. त्यामुळे तो भार कमी करुन नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.


 

जुलैच्या पहिल्याच आठवड्यात मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लागू शकतो. 18 जुलैपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होते. मात्र, त्याआधी नवीन मंत्र्यांना कारभार समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे पहिल्या आठवड्यात विस्तार होण्याची शक्यता आहे.

 

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेना आणि मित्रपक्षांच्या वाट्याला कुठली आणि किती खाती येतात हे पाहणं महत्वाचं आहे. कारण सत्तेत येण्यापूर्वीच भाजपनं मित्रपक्षांना सत्तेचा वाटा देण्याचं आश्वासन दिलं होतं. आता ते पाळलं जातं की नाही? हे या मंत्रिमंडळ विस्तारात कळू शकेल.