मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार आज होणार आहे. सकाळी 9 वाजता विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दहा जण आत मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
जयकुमार रावळ, सुभाष देशमुख, मदन येरावार, संभाजीराव निलंगेकर, रवींद्र चव्हाण, पांडुरंग फुंडकर, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील आज शपथ घेणार आहेत.
दरम्यान, महादेव जानकर यांना देवेंद्र फडणवीस यांनी सुखद धक्का दिला आहे. जानकर कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याशिवाय संभाजी निलंगेकर, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, पांडुरंग फुंडकर, राम शिंदे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतील.
तर कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार हे निश्चित झालं असलं तरी खातेवाटप अद्याप ठरलेलं नाही. मात्र महसूल मंत्रिपद स्वच्छ प्रतिमेचे चंद्रकांत पाटील यांना मिळणार आहे. तर पांडुरंग फुंडकर यांना कृषीमंत्रीपद मिळेल, असं म्हटलं जात आहे.
1) जयकुमार रावळ
पक्ष - भाजप
- भाजपच्या तिकिटावर शहादा-दोंडाईचा येथून 2004 ला पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले, तर 2009 आणि 2014 साली शिंदखेडा मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले.
- इंग्लडमधील कार्डिफ विद्यापीठातून 'एमबीए'ची पदवी
- विविध उद्योग, अनेक महाविद्यालये यांच्या नावावर
- तसंच अनेक गुन्ह्यातही रावल यांचं नाव आहे.
2) सुभाष सुरेशचंद्र देशमुख
पक्ष - भाजप
- स्वच्छ प्रतिमा आणि मितभाषी व्यक्तिमत्व
- पतसंस्था, बँक, दुग्ध व्यवसाय, कृषी विद्यालय, साखर कारखाने आणि अन्य उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती.
- 1998 साली विधान परिषद सदस्य.
- 2004 साली तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्वला शिंदे विरोधात लोकसभा निवडणुकीत 6 हजार मतांनी विजयी.
- 2009 साली माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवून 3 लाख मते मिळवली.
- राजकारणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक.
3) मदन येरावार
पक्ष - भाजप
- भाजपचे यवतमाळचे आमदार
- 1996 आणि 2004 साली देखील यवतमाळ विधानक्षेत्रातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले
- गडकरी यांचे निकटवर्तीय
- मतदारसंघातील सर्व समाजांचा पाठिंबा
4) संभाजीराव निलंगेकर
पक्ष - भाजप
- तीन वेळा आमदार म्हणुन निवडुन गेले....एकवेळ पराभुत
- पहिल्याच निवडणुकीत आजोबा आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटलांचा परभाव.
- दुसऱ्यांदा मात्र शिवाजीराव पाटलांकडून पराभव.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांचे निकटवर्तीय म्हणुन ओळख
- मुंडे विरोधी आणि गडकरी गटाच्या जवळचे म्हणुन ओळख.
5) रवींद्र चव्हाण
पक्ष - भाजप
- भाजपचे डोंबिवलीचे आमदार
- 2005 साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विराजमान.
- 2009 साली भाजपच्या तिकीटावर विधानसभेवर निवड.
- काही दिवसांपूर्वीच जातीवाचक वक्तव्य केल्याने अडचणीत आले.
6) पांडुरंग फुंडकर
पक्ष - भाजप
- सामाजिक कामं आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव
- 1978 आणि 1980 साली खामगाव येथून विधानसभेवर तर 2002, 2008 आणि 2014 साली विधानपरिषदेवर निवडून गेलेले सदस्य
- अकोल्यातून 1989, 1991 आणि 1996 साली लोकसभेवर निवडून गेले
- लहानपानापासून संघाचे कार्यकर्ते
- आणीबाणीच्या काळात तुरुंगवासही भोगला
- 2005 ते 2011 पर्यंत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते म्हणून कार्यकाळ सांभाळला
7) महादेव जगन्नाथ जानकर
पक्ष - राष्ट्रीय समाज पक्ष
- 2003 साली राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापन केली
- 2015 मध्ये विधानपरिषदचे आमदार
- 2009 च्या माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार आणि 2014 च्या बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली
- दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्यांक हा राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रमुख मतदार
- धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन अनेक आंदोलनं
8) सदाभाऊ खोत
पक्ष - स्वाभिमानी शेतकरी संघटना
- विधानपरिषद सभासद
- ऊस, सोयाबीन, कापूस, भात यांच्या दरासाठी वेळोवेळी पदयात्रा आणि आंदोलने
- पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा प्रचंड पाठिंबा
- 2014 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीत समावेश
9) अर्जुन खोतकर
पक्ष - शिवसेना
- जालना विधानसभामतदार संघातून चौथ्यांदा आमदार म्हणून निवड.
- मराठवाड्यातील शिवसेनेच मोठ नेतृत्व आणि ग्रामीण भागात प्रस्थ. विशेषत: शेतकरी प्रश्नावर आवाज उठवणारं शिवसेनेचं मराठवाड्यातील नेतृत्व
- शिवसेनेत 35 वर्षापासून कार्यरत आहेत.
- युतीच्या काळात राज्यमंत्री मंडळात 5 वर्ष राज्यमंत्री म्हणून काम.
- युतीच्या काळात राज्यमंत्री असताना माहिती आणि जनसंपर्क,पर्यटन आणि स्वच्छता आणि पाणीपुरवठा खात्याचा कार्यभार सांभाळला.
10) गुलाबराव पाटील
पक्ष – शिवसेना
- तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून गेले
- एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक अशी ओळख
- शिवसेनेशी सुरुवातीपासूनच एकनिष्ठ
- शिवसेनेचा उत्तर महाराष्ट्रातील चेहरा
एबीपी माझा वेब टीम