सोलापूर : नागरिकत्व सुधारणा कायदा व NRC च्या विरोधात ठिकठिकाणी विविध पद्धतीने आंदोलनं सुरु आहेत. सोलापुरातही नागरिकत्व सुधारणा कायदा व NRC वेगळं आंदोलन पाहायला मिळालं. सोलापुरात आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात नव वर-वधू यांनी मंचावरच नागरिकत्व सुधारणा कायदा आणि NRC चा विरोध केला. या नवीन वधू-वरांनी हातात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि NRC विरोधातील पोस्टर घेत निषेध व्यक्त केला.


सोलापूरतील मिलन फाउंडेशनच्यावतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी देखील केली नव वर-वधु यांनी केली. सोलापुरातील पानगल हायस्कूल परिसरात रविवारी संध्याकाळी हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी शहर काझी मुफ्ती अमजद अली काझी हे देखील उपस्थित होते. नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यापासूनच सोलापुरात या कायद्याच्या विरोधात आंदोलने सुरु आहेत. विविध संघटनांच्यावतीने मोर्चे, रॅली, धरणे करत कायद्याचा विरोध करण्यात आला. मात्र या अनोख्या पद्धतीने केलेल्या आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधलं आहे.


दिल्लीच्या धर्तीवर सोलापुरात ही शाहीनबाग


दिल्लीतील शाहीनबाग परिसरात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि NRC विरोधात गेल्या 50 हून अधिक दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. याच धर्तीवर आता सोलापुरात ही नागरिकत्व सुधारणा कायदा आणि NRC च्या विरोधात महिला रस्त्यावर आल्या आहेत. गेल्या 4 दिवसांपासून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात एमआयएम, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मी या सर्व पक्ष आणि संघटनांच्या कार्यकर्त्या आणि महिला नगरसेविका देखील सहभागी झाल्या आहेत.


पोलिसांनी या आंदोलनासाठी तीनच दिवसांची परवानगी दिली होती. मात्र परवानगी संपली तरी हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका महिलांनी घेतली आहे. मागील 4 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनात सर्व पक्षीय नेत्यांनी देखील हजेरी लावली. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, माकपचे ज्येष्ठ नेते नरसय्या आडम, एमआयएमचे नेते फारुख शाब्दी, वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावत आंदोलनांला पाठिंबा दिला.


संबंधित बातम्या