अमरावती : हनुमान चालीसाच्या मुद्द्यावर आमदार रवी राणा यांच्या या भूमिकेमुळे शिवसेना आणि राणा यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. 23 एप्रिल म्हणजेच उद्या रवी राणा आणि खासदार नवनीत राणा कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचं वाचन करण्याचा निर्धार केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रवी राणा चर्चेत आहेत. व्यावसायिक ते राजकारणी असा त्यांचा प्रवास कसा होता ते जाणून घेऊया.
बांधकाम आणि जमीन खरेदी-विक्री व्यवसायाची पार्श्वभूमी असलेल्या परिवारातून आलेल्या रवी राणा यांनी अल्पावधीतच आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना 2008 साली रवी राणा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 2008 मध्ये अमरावती शहरात बाबा रामदेव यांच्या योग शिबिराचे आयोजन करुन रवी राणा प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके आणि तत्कालीन आमदार सुलभा खोडके यांच्यासोबत असलेल्या राजकीय वादातून त्यांनी 2009 साली पहिल्यांदा बडनेरा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली आणि आमदार सुलभा खोडके यांचा पराभव करुन विधानसभेत पोहोचले. सर्वसामान्य माणसांशी आपुलकीने बोलणे आणि घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मदत करणे या कारणांमुळे आमदार राणा हे माध्यमवर्गीयांचे नेहमीच जवळचे असे आमदार बनले.
त्यानंतर 2011 मध्ये त्यांनी अभिनेत्री नवनीत राणा यांच्याशी लग्नगाठ बांधली आणि नवनीत राणा यांना 2014 साली पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरवले. त्या निवडणुकीत नवनीत यांचा पराभव झाला मात्र त्यांनी जनसंपर्क कायम ठेवला. तर दुसरीकडे आमदार राणा 2014 मध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले.
अपक्ष आमदार असल्याने राणा हे नेहमीच सत्तेच्या जवळ राहिले. 2009 ते 2014 पर्यंत आमदार राणा हे आघाडी सरकारच्या बाजूने राहिले. मात्र 2014 मध्ये राज्यात भाजपचे सरकार येताच त्यांनी भाजपला जवळ केलं. त्यांच्या अशा धूर्त राजकारणामुळेच अमरावती जिल्ह्यात त्यांची ओळख गारुडी आमदार म्हणून आहे.
2019 मध्ये पुन्हा आपली पत्नी नवनीत राणा यांच्याकरता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थन मिळवून त्यांना खासदार बनवून लोकसभेत पाठवले. मात्र लोकसभेत जाताच त्यांनी पुन्हा केंद्रातील सत्ताधारी भाजपला जवळ केले.
सद्यस्थितीत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे भाजपच्या अतिशय जवळचे मानले जात असून शिवसेनेला डिवचण्यासाठीच राणा दाम्पत्याला भाजपचे समर्थन मिळत असल्याचे चित्र आहे.
मुख्यमंत्र्यांवर सातत्याने टीका
आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याने 2020 पासून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. 2020 मध्ये मध्ये त्यांनी शेतकऱ्यांना 50 हजार रुपये एकरी मदत आणि वीजबिल 50 टक्के माफ करावं यासाठी आमदार रवी राणा यांनी मोठं आंदोलन केलं. यावेळी आमदार रवी राणांना त्यावेळी दिवाळी कारागृहात काढावी लागली होती. त्यानंतर राज्यात हनुमान चालीसाचं पठण सुरु झाल्यावर राणा दाम्पत्य यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच मातोश्रीमध्ये हनुमान चालीसा वाचण्याचा आव्हान दिलं. जर वाचली नाही तर आम्ही मातोश्रीवर येऊन बाहेर बसून हनुमान चालीसा पठण करणार असं आवाहन दिलं. त्यानुसार आज राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले असून उद्या मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करणार आहे. पण पोलिसांनी त्यांना नोटीस बजावल्यामुळे आता राणा दाम्पत्य काय भूमिका घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागले आहे.