Bullock Cart : राज्यातील बैलगाडा शर्यतीला नुकतीच न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे हौशी मंडळींकडून राज्याच्या विविध भागात बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जात आहे. बैलगाडा शर्यत म्हणजे एक थरारच असतो. अंगावर शहारे आणणारा हा थरार कसा असतो हे दाखविणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. शर्यतींच्यासमोर घोडी पळवण्याची एक पद्धत आहे. खरे तर बैलगाड्यासमोर घोडी पळवणे हे खूप जोखमीचे काम आहे. अशाच एका घोडीस्वाराला जीवदान देण्याचे काम शर्यतीमधील बैलांनी केले आहे. काळजाचा थरकाप उडवणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
घाटात बैलगाडा शर्यती सुरू झाल्यानंतर या बैलजोड्यांना मार्ग दाखवण्याचे काम घोडीस्वार करत असतो. याच घोडीस्वाराला बैलांनी वाचवले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे, भिरररचा आवाज येताच घाट मारण्यासाठी धावणाऱ्या या बैलजोड्या आणि त्यांना दिशा दाखवणारा घोडीस्वार. शर्यत सुरू असतानाच अचानकपणे घोडीवर स्वार असणाऱ्या या तरुणाचा तोल गेला. त्यामुळे तो जमिनीवर कोसळला. यावेळी त्याच्या मागून येणाऱ्या दोन्ही बैलजोड्या त्याच्या अंगावरूनच जाणार होत्या. अगदी जीव जाण्याची वेळ त्याच्यावर आली होती. परंतु, आजवर त्याने या सर्जा-राजांच्या खिलार जोड्यांवर केलेल्या प्रेमाची जणू त्याला परतफेडच मिळाली.
काळजाचा थरकाप उडवणारा थरार
तरूण घोडीवरून खाली कोसळा होता. काही क्षणात बैलजोड्या त्याला तुडवून पुढे जाणार होत्या. परंतु, जीवापाड प्रेम करणाऱ्या या बैलांनी पायाखाली आलेल्या त्या तरुणाला धक्का ही लागू न देता दोन्ही बैलजोड्यांनी त्याच्यावरून झेप घेतली आणि तरुणाला जीवदान दिले. मालकाचा जीव तर या बैलजोड्यांनी वाचवलाच. परंतु, पुढे जाऊन घाट मारायलाही ते विसरले नाहीत. या घटनेचा हा थरार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.
पुण्यातील जुन्नर तालुक्यातील एका घाटात हा प्रसंग घडल्याचं बोललं जात आहे. परंतु, याबाबतची कोणतीही पुष्टी एबीपी माझा करत नाही. बैलगाडा शर्यतीच्या घाटात कसा थरार असतो हे दाखविण्यासाठी हा व्हिडीओ आम्ही दाखवत आहोत.
व्हिडीओ पाहा!
महत्वाच्या बातम्या