चंद्रपूर : चंद्रपुरात कोसळलेल्या सॅटेलाईटची दखल अखेर 'इस्रो' (ISRO) ने घेतली आहे.  सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी आणि परिसरात अवकाशातून सॅटेलाईटचे काही भाग  पडले होते. 2 एप्रिलला राज्यभरातून आकाशात आगीचे लोळ पृथ्वीकडे झेपावत असल्याची दृश्ये लाखो लोकांनी अनुभवली आणि कॅमेराबध्द केली. लाडबोरी येथे गावात एका मोकळ्या भूखंडावर पडली होती. चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी इस्रोला याबाबत ई मेल द्वारे माहिती दिली होती. आपल्या FB पेजवरून इस्रोने तीन दिवसांनी पोस्ट करून घटनेची दखल घेतल्याचे जाहीर केले आहे. इस्रोच्या तज्ज्ञ वैज्ञानिकांचे एक पथक या वस्तू अभ्यासण्यासाठी लाडबोरी आणि परीसरात भेट देणार आहेत. 


सॅटेलाईटचे हे भाग चंद्रपूर जिल्ह्यातील लाडबोरी आणि पवनपार तर वर्धा जिल्ह्यातील वाघेडा आणि धामणगाव परिसरात कोसळले.  10 फूट व्यासाची मिश्र धातूची रिंग, धातूचे पाच बलून 5 अन्य ठिकाणी सापडले होते. सॅटेलाईटचे हे भाग सध्या प्रशासनाच्या ताब्यात आहेत. सोबतच सॅटेलाईटचे अन्य भाग गोळा करण्यासाठी प्रशासनाने विशेष टीम गठीत केल्या आहेत.



चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात सापडलेल्या सॅटेलाईटच्या या भागांमुळे सर्वत्र कुतूहल आणि भीती निर्माण झाली आहे. सोबतच या वस्तू नेमक्या काय आहेत, कुठे वापरल्या जातात आणि त्या का कोसळल्या याबद्दल अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र खगोल अभ्यासकांनी हे तुकडे अनियंत्रित झालेल्या एखाद्या सॅटेलाईटचे असावे, अशी शक्यता व्यक्त केली आहे.


 महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यात अवकाशातून एक रोषणाई जाताना दिसली. लोकांनी ही दृश्य कॅमेऱ्यात कैद केली आहेत. ही रोषणाई आगीच्या गोळ्यांप्रमाणे असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये आकाशात ही रोषणाई दिसली. चंद्रपूर,  नागपूर, वाशिम, अकोला, जळगाव, जालना आणि बुलडाणा,अशा जिल्ह्यामध्ये ही खगोलीय घटना नागरिकांनी पाहिलं असल्याचं समोर आलंय.


संबंधित बातम्या :


Wardha : समुद्रपूर तालुक्यात सापडले अवकाशातून पडलेले यंत्र अवशेष, पाहा फोटो