बुलढाणा : जिल्ह्यातून (Buldhana District) जाणारा नांदेड-बुऱ्हाणपूर (Nanded-Burhanpur National Highway) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161वरील शेगाव-जळगाव (shegaon-Jalgaon) दरम्यान असलेल्या पूर्णा नदीवरील पुलाचं बांधकाम अपूर्ण असल्याने रोज अपघात घडून अनेकांचे प्राण जात आहेत. तर अनेक नागरिक कायमचे अपंग होत आहेत. म्हणून खिरोडा येथील नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावरील हा पूल अडवून धरल्याने या मार्गावरील वाहतूक वळण रस्त्याने वळविण्यात आली आहे. महामार्गावरील या पुलाचं काम ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीने 2017 पासून अपूर्ण ठेवल्याने व अपूर्ण पुलावरून वाहतूक सुरू केल्याने रोजच या पुलावर अपघात घडतात. यामुळे गावकऱ्यांनी हा मार्गच बंद पडलाय. यामुळे मात्र वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे. संबंधित कंपनीच्या व्यवस्थापक उपाध्याय यांच्याशी फोनवरून माहिती घेतली असता "या पुलाचं काम खिरोडा येथील गावकऱ्यांनीच बंद पाडलं असल्याची माहिती दिली तर संबंधित ठेकेदार हा "मी गडकरींचा माणूस असून माझं काही बिघडत नाही" अशी गावकऱ्यांना धमकी देत असल्याचे गावच्या सरपंचाचं म्हणणं आहे.


काय आहे नेमकं प्रकरण


जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग जुनाच असून आता या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आल्याने यावरील सर्व पुलांचे काम नवीन पद्धतीने करण्यात आलंय. यानुसार शेगाव - संग्रामपूर दरम्यान असलेल्या खिरोडा गावाजवळील पूर्णा नदीवरील या पुलाच काम 2017 पासून सुरू आहे. पण अद्याप या पुलाचं काम पूर्णत्वास गेलं नाही. हे काम ईगल कन्स्ट्रक्शन कंपनी करीत असून कंपनीचे व्यवस्थापक  उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार पुलाच काम 90 टक्के पूर्ण झालं असून अंतिम 10 टक्के काम सुरू असताना खिरोडा गावातीलच नागरिकांनी गावाजवळ असलेल्या स्मशानभूमीत अतिरिक्त बांधकाम करून देण्याची मागणी करत काम बंद पाडलं. दरम्यान या पुलावरून अनधिकृतरित्या वाहतूक सुरू होती. त्यामुळे कंपनीने हा पूल अजूनही हस्तांतरित केला नसून पुलावरील वाहतूक ही अवैध होती. या पुलावरील अपघातास आम्ही जबाबदार नसल्याचं कंपनीने म्हटलं आहे. तर गावकऱ्यांनी आरोप केलाय की गावाजवळील स्मशानभूमी या ठेकेदाराने पाडली. त्यामुळे स्मशानभूमीत दुरुस्ती करून दिल्याशिवाय आम्ही पुढील काम करू देणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. गावकरी व संबंधित ठेकेदारांच्या भांडणात मात्र वाहनधारकांना त्रास होत असल्याचं चित्र आहे.


पुलावरील वाहतूक अवैधरित्या सुरू


गेल्या ऑगस्ट महिन्यात पूर्णा नदीला महापूर आल्याने जुना पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांनी या बांधकाम सुरू असलेल्या नवीन पुलावरून सुरू केली. ती अद्याप सुरूच होती. पण हा पूल अपूर्ण असल्याने पुलावर मोठ्या प्रमाणात अपघात झालेत. त्यामुळे आता हे अपघात होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी आता या पुलावरील वाहतूक बंद केली.


वाहनधारकांची काय आहे मागणी


राष्ट्रीय महामार्गावरील या पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण करून या पुलावरून वाहतूक सुरू करावी अशी मागणी या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांची आहे. सध्या वळण रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने संबंधित महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha





इतर महत्वाच्या बातम्या




OBC Reservation : ओबीसी आरक्षण रद्द झालं म्हणजे नेमकं काय?, सुप्रीम कोर्टाचा निर्णय सोप्या शब्दात