Buldhana News बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर(Ravikant Tupkar) यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज सलग तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे रविकांत तुपकरांवर अटकेची टांगती तलवार अद्याप कायम असून जामीन अर्जावरील पुढील सुनावणी आता 21 फेब्रुवारीला होणार असल्याचे न्यायालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲड. शर्वरी तुपकर यांनी वकील म्हणून तुपकरांची बाजू मांडली. दरम्यान सरकारी वकील आणि ॲड. शर्वरी तुपकर यांच्यामध्ये मेधा पाटकर यांच्या आंदोलनाचा हवाला देत आज युक्तीवाद झाला. त्यामुळे रविकांत तुपकरांच्या अटक अथवा जामीनाबाबत तूर्तास कुठलाही निर्णय आज झालेला नाही. मात्र पुढील सुनावणीत न्यायालय काय निर्णय देईल? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
जामीन अर्जावरील पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीला
शेतकऱ्यांसाठी झालेल्या विविध आंदोलनात रविकांत तुपकर यांच्यावर दाखल 23 गुन्ह्यात न्यायालयाने त्याना जमीन मंजूर केला होता. मात्र जमीन रद्द करण्याच्या मागणीसाठी पुन्हा बुलढाणा पोलिसांनी जिल्हा न्यायालयात धाव घेत जामीन रद्द करण्याबाबत याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी आज होणे अपेक्षित होते. मात्र आज सलग तिसऱ्यांदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आंदोलन करणे हा लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे. कुठलेही क्रिमिनल गुन्हे रविकांत तुपकर यांच्यावर नाहीत. सोबतच मेधा पाटकर यांच्या आंदोलनाचा हवाला देत ॲड. शर्वरी तुपकर यांनी सरकारी वकिलांनी उपस्थित केलेले मुद्दे खोडून काढले आहेत. आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. पण निकाल विरोधात गेला आणि पुन्हा तुरुंगात जाण्याचीही वेळ आली, तर मी तुरुंगातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार रविकांत तुपकर यांनी केला आहे.
मी तुरुंगात जाण्यास तयार
न्यायालयाने दोन्हीकडचा युक्तिवाद ऐकून घेतला. येत्या 21 फेब्रुवारीला या केसच्या संबंधितला निकाल होणार आहे. 21 तारखेला निकाल जर का आपल्या विरोधात गेला, तरी तो निकाल आम्हाला मान्य असेल. न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असून आपण न्यायालयाचा आदर करतो. वेळप्रसंगी मला तुरुंगात जायची जरी वेळ आली तरी मी तुरुंगात जाण्यास तयार असेल. मात्र मला तुरंगात टाकण्यासाठी कितीतरी पुढार्यांना आपली ताकद पणाला लावावी लागली. हा खऱ्या अर्थाने एका शेतकऱ्याच्या पोराचा विजय आहे. माझे आई-वडील शेतात काम करतात. मी अतिशय सामान्य घरातला मुलगा असून देखील जेव्हा मी लोकसभेच्या रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला, तर प्रस्थापित पुढाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. म्हणून या लोकांनी पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला तुरुंगात डांबण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप देखील रविकांत तुपकर यांनी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या