बुलढाणा :  जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड या गावातील शाळा चक्क चोरीला गेली की तिला पाय फुटून कुठे निघून गेली असा सवाल या गावातील प्राथमिक शाळेतील मुलांना व गावातील नागरिकांना पडला आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी अचानक गायब झालेल्या शाळेला शोधून काढण्यासाठी शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे. 


बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड गाव हे जेमतेम दोन हजारांच्या घरात लोकसंख्या असणारे. गावात तीन खोल्या असणारी जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवी पर्यंतची दोन शिक्षक असलेली शाळा गेल्या 17 जून 2021 पर्यंत अस्तित्वात होती. पण अचानक 18 जून रोजी शाळा गायब झाल्याने नागरिकांना आश्चर्य वाटलं. काल-परवा पर्यंत शाळेच्या परिसरात खेळण्याऱ्या मुलांनाही शाळा गायब झाल्याचं वाटलं आणि गावातील नागरिकांनी चौकशीला सुरुवात केली.


शाळा गायब झाल्याची माहिती मिळताच एबीपी माझाची टीम या गावात पोहचली. मिळालेली माहिती घेतली असता, बोरखेड या गावात वर्ग एक ते वर्ग पाच अशी दोन वर्ग खोल्यांची शाळा होती. गावातील सरपंच , ग्रामसेवक व शाळेचा मुख्याध्यापक यांनी संगनमताने ही शाळा इमारत धोकादायक असल्याचं दाखवून चक्क एका रात्रीतून जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करून शाळेतील साहित्य लंपास केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. यासाठी कुठलीही प्रशासकीय परवानगी मुख्याध्यापक किंवा सरपंचाने घेतली नसल्याचंही गावकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे या गावातील मुलांनी आता कुठे शिकायचं हा प्रश्न गावकाऱ्यांसमोर आहे. यासंबंधी गावातील नागरिकांनी तक्रारही केली आहे. एकंदरीत ही शाळा इमारत धोकादायक दाखवून, खोटा अहवाल पाठवून कुठलीही प्रशासकीय मान्यता न घेता मुख्याध्यापक, सरपंच व ग्रामसेवक यांनी आपला आर्थिक लाभ करून घेण्यासाठी चक्क गावातील शाळाच भुईसपाट केल्याचा आरोप गावकऱ्यानी केला आहे.


शाळा ही दि 10 जून रोजी झालेल्या वादळात व पावसामुळे पडल्याचा अहवाल खुद्द या शाळेच्या मुख्याध्यापकांनी वरिष्ठांना लेखी स्वरूपात कळविला आहे. शाळा कशी भुईसपाट झाली याबद्दल विचारणा केली असता, शाळा कशी पडली किंवा कुणी पाडली याबद्दल मला काहीही माहिती नसल्याचं या शाळेवरील अधिकृत मुख्याध्यापक सांगतात. 
 
याबाबतीत जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही विचारणा केली असता याशाळा गायब झाल्या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून ,शाळा मुख्याध्यापक यांना पोलिसात तक्रार नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्याचं जिल्हा शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सांगितलं.


एकंदरीत गेल्या दीड वर्षांपासून कोरोना व लॉकडाऊनमुळे शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला असतानाच आता तर ग्रामीण भागात चक्क शाळाच्या-शाळा गायब होण्याचा प्रकार समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद अधिकारी व शिक्षण विभाग मात्र या प्रकारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करीत आहेत.


महत्वाच्या बातम्या :