मुंबई : फूटपाथवरील तीन वर्षांच्या मुलाचा लागलेला लळा आणि त्या मुलाच्या भविष्याची चिंता यामुळे एका मजुराने त्याचं अपहरण केलं. मात्र त्याचा उद्देश चांगला असला तरीही त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल होऊन अटक झाली आहे. मुंबईतील घाटकोपरमध्ये ही घटना घडली. घाटकोपरच्या भटवाडी विभागात फूटपाथवर प्रिन्स शिंदे या अवघ्या दोन वर्ष आणि आठ महिन्यांच्या चिमुकल्याचं मेहबूब शेख या 52 वर्षीय व्यक्तीने 19 मे रोजी अपहरण केलं होतं.
प्रिन्स शिंदे हा औरंगाबाद इथे राहणाऱ्या सानू यांच्या पहिल्या पतीपासून झालेला मुलगा आहे. मात्र सानूच्या आईने तिची मुंबईमधील मैत्रीण वैष्णवी खानला गेल्यावर्षी प्रिन्सचा सांभाळ करण्यास दिलं होतं. वैष्णवी ही देखील मजूर असून भटवाडीच्या फूटपाथवर राहते. तिच्याबरोबरच प्रिन्स राहू लागला. याच फूटपाथवर मेहबूबही राहत होता. हळूहळू प्रिन्स हा मेहबूबसोबत जास्त वेळ राहू लागला. त्यांच्यातला जिव्हाळा एवढा वाढला की मेहबूब सगळ्यांना तो आपला नातूच असल्याचं सांगत असे. त्याला जेवायला घालणं, आंघोळ घालणं, त्याची काळजी घेणं अशी सर्व कामं मेहबूब करु लागला होता. प्रिन्सचं आयुष्य असं फूटपाथवर जाऊ नये, त्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं याची काळजी मेहबूबला होऊ लागली. यासाठी अखेर मेहबूबने वैष्णवीकडून त्याचं अपहरण करण्याचा निर्णय घेतला.
19 रोजी प्रिन्सला घेऊन मेहबूबने थेट अहमदनगरमधील पारनेर तालुक्यात असलेल्या जवला गावातील आपल्या बहिणीचं घर गाठलं. इकडे वैष्णवीने दोन दिवस प्रिन्स आणि मेहबूबचा शोध घेतला. मात्र तो सापडला आला नाही. यामुळे घाटकोपर पोलीस ठाण्यात प्रिन्सच्या अपहरणचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक उमेश सावंत, मैत्रानंद खंदारे, पोलीस उपनिरीक्षक मोहन जगदाळे, महेश शेलार, अनिल बांगर आणि अश्विनी पाटील यांचं पथक तयार करुन मेहबूब आणि प्रिन्सचा शोध सुरु केला. मेहबूबच्या सर्व नातेवाईक आणि मित्र मंडळींची चौकशी केली असता अहमदनगर इथे त्याचे नातेवाईक राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अहमदनगर गाठून या ठिकाणी तपासणी केली असता त्यांना प्रिन्स आणि मेहबूब त्या ठिकाणी जवला गावात सापडले.
पोलिसांनी मेहबूबला ताब्यात घेऊन अपहरणाच्या गुन्ह्यात अटक केली. तर प्रिन्सला पुन्हा फूटपाथवरील आयुष्य लाभू नये म्हणून बाल कल्याण केंद्राकडे देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. मेहबूबला प्रिन्सचा लागलेला लळा, त्याच्यावरचं प्रेम आणि त्याच्या भविष्याची चिंता जरी योग्य असली तरी त्याचं अपहरण करणं हा गुन्हा असल्याने पोलिसांना त्याला अटक करावी लागली आहे. मात्र आता प्रिन्सचं भविष्य यामुळे तरी चांगलं व्हावं ही अपेक्षा घाटकोपर पोलीस करत आहेत.