Bhendwal Bhavishyavani : सर्वसाधारण पाऊसमान, पिकांना भाव मिळणार नाही, तर यंदाही रोगराईचं संकट; भेंडवळची भविष्यवाणी जाहीर
बुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळ येथे घटमांडणी करीत भाकित वर्तविले आहे.यंदा जून महिन्यात कमी तर जुलै महिन्यात पाऊस चांगल्या प्रमाणात पडेल. ऑगस्ट महिन्यात साधारण तर सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी असेल.देशावर रोगराईचे संकट मोठ्याप्रमाणावर असून देशात आर्थिक टंचाई भासणार.
बुलडाणा : अखेर आज प्रसिद्ध अशा भेंडवळच्या घट मांडणीचे भाकित जाहीर झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचं पालन करत 350 वर्षांहून अधिक अशा भेंडवळच्या भविष्यवाणीची (Buldhana Bhendwal Bhavishyavani 2021) परंपरा अखंडित ठेवली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या या भविष्यवाणीकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं. भेंडवळ घटमांडणीनुसार यंदा जून महिन्यात कमी तर जुलै महिन्यात पाऊस चांगल्या प्रमाणात पडेल. ऑगस्ट महिन्यात साधारण तर सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी असेल असं भाकित वर्तवण्यात आलं आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही देशावर रोगराईचे संकट मोठ्याप्रमाणावर असून देशात आर्थिक टंचाई भासणार असल्याचं सांगितलं आहे.
पाऊस आणि पिकांबाबत काय आहे भेंडवळची भविष्यवाणी?
- जून महिन्यात कमी तर जुलै महिन्यात पाऊस चांगल्या प्रमाणात पाऊस पडेल
- ऑगस्ट महिन्यात साधारण तर सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी होईल
- विशेष म्हणजे अवकाळी पावसातून आगामी वर्षात बळीराजाला दिलासा मिळणार आहे.
- यंदा कापूस, ज्वारी, मूग अशी पीक चांगल्या प्रमाणात येणार असून भाव ही चांगला राहणार आहे.
- तांदूळ, वाटाणा, जवस, गहू यावर्षी चांगले येईल पण या पिकांना भाव मिळणार नाही.
देशातील रोगराईबद्दल काय आहे भेंडवळची भविष्यवाणी?
- यावर्षीही रोगराई जास्त प्रमाणात असणार
- कोरोनासारख्या महामारीतून यावर्षभरात तरी दिलासा मिळण्याची शक्यता नाही.
देशावरील संकटावर काय आहे भेंडवळची भविष्यवाणी?
- देशाच्या प्रधानावर ही संकट आहे असं भाकित वर्तवण्यात आलं आहे.
- देशाच्या सरंक्षण खात्यावर दबाव, ताण राहणार आहे.
- देशात घुसखोरीचा प्रभाव जास्त राहील.
- पृथ्वीवर मोठं संकट येईल तर संपूर्ण जगात आर्थिक टंचाई भासेल.
राजकीय क्षेत्राबद्दल काय आहे भेंडवळची भविष्यवाणी?
- देशाच्या राजाची गादी कायम राहणार
- राजाला अनेक अडचणींचा, तणावाचा सामना करावा लागेल.
काय आहे भेंडवळ भविष्यवाणी?
पर्जन्यमान, पिकांची स्थिती, शेतीमालाचे दर, देशातील राजकीय आणि आर्थिक स्थितीबाबत भेंडवळमध्ये दरवर्षी भविष्यवाणी करण्यात येते. गेल्या 350 वर्षांपासून या घट मांडणीच्या आधारावर वर्षभराचं राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि हवामानाचं भविष्य वर्तवलं जातं.
शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया या काळात करुन वर्षभराची भाकिते या घट मांडणीत करण्यात येतात. 350 वर्षांपूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही घट मांडणी सुरु केली होती. आता त्यांचे वंशजही परंपरा कायम ठेवून आहेत.